आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करागेल्या दोन वर्षांपासून कोरोना संकटामुळे फिके झालेले गुलाबाचे रंग यंदाच्या व्हॅलेंटाइन डेच्या निमित्ताने पुन्हा गडद झाल्याचे चित्र आहे. कोरोनाचे निर्बंध आंतरराष्ट्रीय स्तरावर अद्याप कायम असल्याने गुलाबाच्या निर्यातीचे प्रमाण घटले आहे. ही घट तब्बल ४० टक्क्यांच्या आसपास असूनही गुलाब उत्पादक शेतकरी यंदा खुशीत आहेत. कारण देशांतर्गत आणि स्थानिक बाजारपेठेने गुलाब उत्पादकांना सर्वोत्तम भाव दिला आहे.
गुलाबाचे सर्वाधिक उत्पादन असणाऱ्या पुण्याजवळच्या मावळ भागातील उत्तम दर्जाच्या गुलाबास एका बंचसाठी (२० फुले) ४०० ते ४५० रुपये असा भाव मिळाला आहे. गेल्या दहा वर्षांत हे भाव २०० ते २५० रुपयांच्या दरम्यान होते, अशी माहिती गुलाब उत्पादक वाघू चोपडे यांनी दिली.
व्हॅलेंटाइन डेच्या निमित्ताने गुलाबाची सर्वाधिक उलाढाल मावळ परिसरात होते. राज्यातील ७० टक्के गुलाबाचे उत्पादन मावळ भागात घेतले जाते. येथील गुलाब आकार, रंग, ताजेपणा या वैशिष्ट्यांमुळे जगभर प्रसिद्ध आहेत. मावळ परिसरात ६०० एकरांवर गुलाबाचे उत्पादन घेतले जाते. अनेक शेतकऱ्यांनी त्यासाठी ग्रीन हाउसेस उभारली आहेत.
मात्र, ग्रीन हाउसेस आणि प्रत्यक्ष गुलाबाच्या रोपांची देखभाल खर्चिक स्वरूपाची असते. एका पाॅलिहाऊसचा एका महिन्याचा देखभाल खर्च ८० हजारांच्या घरात जात असल्याने सर्वसाधारण शेतकरी पॉलिहाऊसच्या उभारणीत अधिक रस दाखवत नाहीत. मावळ गुलाब उत्पादक संघटना आणि पवना फ्लॉवर उत्पादक संघाचे अध्यक्ष मुकुंद ठाकर म्हणाले, ‘आंतरराष्ट्रीय हवाई वाहतुकीवरील निर्बंध कायम आहेत. तसेच गुलाबाच्या विदेशी एजंटांनी यंदा भारताऐवजी केनिया, इथिओपिया येथील फुले मागवल्याची माहिती आहे. त्यामुळे निर्यातीत लक्षणीय घट आहे. दरम्यान सुरत, बडोदा, इंदूर, हैदराबाद, दिल्ली, नागपूर येथे मोठ्या प्रमाणात फुले रवाना झाल्याचे अरुण वीर यांनी सांगितले.
मावळमधील फुलांची युरोपात प्रामुख्याने निर्यात
डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यापासून गुलाबांचे कटिंग व बेंडिंगला सुरुवात होते. थंड हवामान गुलाबाला पोषक आहे. २० जानेवारी ते १० फेब्रुवारीदरम्यान निर्यातीचा कालावधी असून मावळातील गुलाब उठावदार रंग, मोठा आकार आणि ताजेपणा या वैशिष्ट्यांमुळे लोकप्रिय आहे ५५ ते ७० सेंटिमीटर आकाराचे फूल निर्यातीत प्राधान्यक्रमावर ए ग्रेड म्हटले जाते. त्याखालील आकाराची फुले सेकंड ग्रेड ४५ ते ५५ सेंमी म्हटली जातात. मावळमधील फुले प्रामुख्याने युरोपीय देशांत निर्यात होतात.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.