आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजैन समाजाचे पवित्र स्थान असलेल्या झारखंड मधील सम्मेद शिखरजी याठिकाणास पर्यटन स्थळा ऐवजी तीर्थस्थान म्हणून घाेषित करण्याची मागणी करण्यात आली आहे. याकरिता सकल जैन संघातर्फे पुण्यात नऊ जानेवारी राेजी शंकरशेठ रस्त्यावरील ओसवाल बंधू समाज कार्यालय ते जिल्हाधिकारी कार्यालय यादरम्यान भव्य मूक माेर्चा काढण्यात येणार आहे.
पुणे, पिंपरी चिंचवडसह जिल्हयातील 50 हजारपेक्षा अधिक जैन समाज यात सहभागी हाेणार असल्याची माहिती संघाचे अध्यक्ष अचल जैन यांनी गुरवारी पत्रकार परिषदेत दिली आहे. यावेळी मिलिंद फडे, विजय भंडारी, सतीश शहा, अनिल गेल्डा, याेगेश पांडे उपस्थित हाेते.
जैन म्हणाले, महाराष्ट्रासह देशातील मुंबई, दिल्ली, अहमदाबाद, इंदोर, सुरत, बंगळुरु, कोल्हापूर याठिकाणी हजारोंच्या संख्येने जैन समाजाचा मोर्चा निघाला आहे. या विषयाकडे केंद्र व झारखंड सरकारचे लक्ष वेधण्यासाठी इतर शहरांमध्येही असेच मोर्चे निघणार आहेत. सम्मेद शिखरजी या पवित्र स्थळाविषयी जैन समाजाच्या भावना तीव्र आहेत.
सरकारने याची त्वरित दखल घ्यावी, अशी अपेक्षा आहे. जैन धर्मियांच्या भावना तीव्र असण्याचे कारण म्हणजे जैन धर्माच्या 24 पैकी 20 तीर्थकरांची निर्वाणभूमी श्री सम्मेद शिखरजी येथे आहे. हिंदु धर्मियांसाठी जसे काशी तीर्थस्थान आहे तसेच, जैन धर्मियांसाठी श्री सम्मेद शिखरजी आहे. जैन समाजातील प्रत्येक व्यक्ती त्याच्या आयुष्यात एकदातरी या तीर्थक्षेत्राला भेट देण्याची इच्छा ठेवते आणि दर्शनासाठी जाते. याठिकाणी दर्शन घेतल्याशिवाय मोक्ष मिळत नाही, अशी जैन धर्मियांची भावना आहे.
या तीर्थस्थानाचा परिसर आदिवासीबहुल आहे. जंगल, डोंगर यांनी तो व्यापला आहे. हे स्थळ समुद्रसपाटीपासून सुमारे पाच हजार फूट उंच आहे. येथे 20 तीर्थंकरांच्या चरण पादुका आहेत. दर्शनासाठी येथे 27 किलोमीटरची परिक्रमा पायी करावी लागते.जैन धर्मियांचे पवित्रस्थान म्हणून हे स्थान हजारो वर्षांपासून याठिकाणी आहे. मुघल व त्यानंतरची ब्रिटिश राजवट ते आतापर्यंत हे तीर्थस्थान टिकून राहिले आहे. झारखंड राज्याच्या निर्मितीपूर्वी हे स्थळ बिहारमध्ये होते.
सध्या ते झारखंड राज्यात असून 2018 मध्ये झारखंड सरकारने हे स्थळ पर्यटनस्थळ घोषित केले व तशी अधिसूचना काढली. त्यानंतर याला भारत सरकारच्या वन मंत्रालयाने इको सेंसिटिव्ह झोन सोबतच पर्यटनस्थळ म्हणून 5 ऑगस्ट 2019 मध्ये मान्यता दिली. परंतु हे जैन धर्मियांचे पवित्र तीर्थस्थान असल्याने त्याला पर्यटनस्थळ म्हणून मिळालेली मान्यता योग्य नाही. हे पर्यटनस्थळ म्हणून न राहता ते तीर्थक्षेत्रच राहिले पाहिजे अशी सकल जैन समाजाची मागणी आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.