आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सासवडची घटना:उच्चशिक्षित पत्नीचा खून करून आजारी मुलाचीही केली हत्या?; पित्याने खून केल्याचा पोलिसांना संशय

पुणे4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • मुलगा ऑटिझमग्रस्त, मूळ मध्य प्रदेशचे

सासवड येथे मायलेकराचा खून करून त्यांचे मृतदेह वेगवेगळ्या ठिकाणी टाकल्याप्रकरणी पोलिसांच्या हाती महत्त्वाचे धागेदोरे लागले आहेत. पोलिसांनी मुलाच्या पित्याचा युद्धपातळीवर शोध सुरू केला असून त्याच्यावरच संशयाची सुई आहे. मुलगा ऑटिझमग्रस्त असल्याची माहिती पुढे आली आहे. याप्रकरणी सासवड आणि भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आयान शेख (६) व आलिया शेख (३५) अशी खून झालेल्या मायलेकरांची नावे आहेत. आबिद शेख याचा शोध घेण्यासाठी पोलिसांची सात पथके रवाना झाली आहेत. आबिद शेख एका खासगी कंपनीत व्यवस्थापक म्हणून काम करत होता. तो मार्केट यार्ड येथे गाडी सोडून स्वारगेटच्या दिशेने चालत जाताना सीसीटीव्हीत कैद झाला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शेख कुटुंब मूळचे मध्य प्रदेशातील आहे. २००७ पासून शेख नोकरीनिमित्त पुण्यात राहत होते. सध्या ते धानोरीतून चऱ्होलीमध्ये राहायला आले होते. आलिया शेख याही एका खासगी कंपनीत काम करत होत्या. मात्र, मुलाचा संभाळ करण्यासाठी त्यांनी अडीच वर्षांपूर्वी नोकरी सोडली होती. मुलगा ऑटिझमग्रस्त असल्याचे लक्षात आल्यावर कुटुंब तणावात होते. मागील काही महिन्यांपासून मुलाला शिकवण्यासाठी घरी एक शिक्षिकाही ठेवण्यात आली होती. आलिया शेख यांचे वडील मध्य प्रदेशात वनाधिकारी होते, तर आबिद शेख याचे वडील जिल्हा योजना नियोजन अधिकारी होते. त्याचा भाऊ कॅनडामध्ये राहत आहे.

आबिदने गाडी भाड्याने घेतली होती. तो सलग ११, १२, १३ आणि १४ जून रोजी घरातून बाहेर कुटुंबाला घेऊन जात होता. सकाळी फिरायला गेल्यावर संध्याकाळी कुटुंब पुन्हा घरी येत होते. मात्र १४ जून रोजी आबिद कुटुंबाला घेऊन सासवड-दिवेघाट-बनेश्‍वर-बोपदेव घाट- दिवे घाटातून पुन्हा सासवडला गेला. तेथे त्याने रात्री साडेआठच्या सुमारास गाडीतच आलियाचा खून केल्याची शक्‍यता आहे. आलियाचा मृतदेह सासवड पोलिसांना सापडला होता. यानंतर त्याने गाडी पुन्हा कात्रज- दत्तनगर चौक-कात्रज नवा बोगदा येथे नेली. तेथे मुलाचा खून करून त्याचा मृतदेह टाकला असावा. यानंतर १५ तारखेला पहाटे एक वाजता त्याने गाडी मार्केट यार्ड येथे सोडली. तेथे गाडीतून उतरून स्वारगेटच्या दिशेने चालत जाताना तो सीसीटीव्हीत कैद झाला आहे.

आबिदला जबर मारहाण, मुलाचा गळा घोटला
पोलिसांना गाडीमध्ये दोन लोखंडी पाइप सापडले आहेत. सोबतच मुलाचे कपडे व खाण्याचे साहित्य आहे. मागच्या सीटवर मोठ्या प्रमाणात रक्त सांडलेले होते. तसेच गाडीमध्ये तिघांव्यतिरिक्त आणखी कोणी नसल्याचे प्रथमदर्शनी दिसत आहे. यामुळे संशयाची सुई आबिदकडे असल्याचे पोलिसांनी सांगितले. जोपर्यंत आबिद हाती येत नाही तोपर्यंत घटनेचा उलगडा होणार नसल्याचे पोलिसांनी सांगितले. दरम्यान, आलियाच्या शवविच्छेदनाच्या अहवालात तिला जबर मारहाण केल्याने तर अयानच्या शवविच्छेदनाच्या अहवालात गळा दाबला गेल्याने मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले आहे.

बातम्या आणखी आहेत...