आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजुन्नर तालुक्यातील तांबेवाडी येथील विविध कार्यकारी सोसायटीचे संचालक किशोर तांबे यांचा खून करून त्यांचा मृतदेह अज्ञातांनी विहिरीत फेकून दिल्याचा प्रकार उघडकीस आला होता. पोलिसांनी याप्रकरणी तपास करत दोन आरोपींना जेरबंद केले आहे. व्यवसायिक स्पर्धेतून तसेच बदनामीच्या रागातून पूर्वनियोजित कट रचून आरोपींनी सदरचा गुन्हा केला असल्याचे पोलिसांच्या चौकशीत निष्पन्न झाल्याची माहिती शनिवारी देण्यात आली आहे.
याप्रकरणी पांडुरंग जिजाभाऊ तांबे (वय 39 रा. तांबेवाडी, तालुका जुन्नर, पुणे) आणि महेश गोरखनाथ कसाळ (वय -30 ,रा. आळे फाटा ,तालुका जुन्नर ,पुणे) या दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी आळेफाटा पोलीस ठाण्यात आरोपी विरोधात संतोष खंडू तांबे यांनी तक्रार दाखल केली आहे.
श्वानाच्या मदतीने तपास
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ,पाच एप्रिल रोजी रात्री साडेआठच्या सुमारास किशोर तांबे हे शेतात जातो असे सांगून घरातून निघून गेले होते. मात्र, ते घरी परतले नव्हते त्यामुळे त्यांचा शोध पोलिसांनी सुरू केला होता. यादरम्यान, त्यांचा खून झाली असण्याची शक्यता गृहीत धरून स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस व आळेफाटा पोलिस ठाण्याचे पोलिस तसेच श्वान दुर्गा यांनी गुन्ह्याचा तपास सुरू केला होता.
असा काढला माग
गुन्ह्याच्या तपासा दरम्यान श्वान दुर्गा हिस मयताच्या कपड्यांचा वास देऊन मयतचा शोध सुरू करण्यात आला होता. श्वान दुर्गा हिने मयताचा माग काढत, एका कॅनल जवळील एका विहिरीजवळ गेली. परंतु त्याठिकाणी आजूबाजूला शोध घेऊन ही मयताचा ठावठिकाणा लागला नाही. सदर गुन्ह्याचा तपास चालू असताना ,पोलिसांना सदर गुन्ह्यातील आरोपी पांडुरंग तांबे व महेश कासार यांनी खून केल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी आरोपींचा शोध घेऊन त्यांना अटक केली.
त्यांच्याकडील चौकशी दरम्यान त्यांनी सांगितले की ,व्यवसायातील प्रतिस्पर्ध्याचा तसेच बदनामी केल्याचा राग मनात ठेवून पूर्वनियोजित कट करून संगनमातनी मयतास दारू पाजून त्याच्या डोक्यात लोखंडी रॉड घालून त्याचा खून करून पुरावा नष्ट करण्यासाठी त्याचा मृतदेह मुरलीधर पिंगळे यांच्या शेतातील विहिरीत टाकल्याचे सांगितले. याप्रकरणी पोलिसांनी गुन्ह्यात वापरण्यात आलेली वॅगनार कार ही जप्त केली आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास आळेफाटा पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक सुनील बडगुजर हे करत आहेत.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.