आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकेंद्र सरकारने सैन्यभरतीसाठी नुकत्याच जाहीर केलेल्या ‘अग्निपथ’ योजनेवरुन युवकांमध्ये संपूर्ण देशभर अस्वस्थतेचे वातावरण निर्माण झाले असून सुमारे 14 राज्यांतील तरुण रस्त्यावर उतरले आहेत. ही योजना केंद्र सरकारने कोणत्याही समाजघटकांशी चर्चा न करता नेहमीप्रमाणे अतिशय घाईघाईने रेटली आहे. परंतु यामुळे सैन्यदलासारख्या अतिशय महत्वाच्या संस्थेवर आघात होत असल्याची टिकाही पक्षाकडून करण्यात आली आहे. शहरात आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने मराठा युद्ध स्मारक कॅम्प येथे आंदोलन करण्यात आले.
माझी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री म्हणाले होते ‘जय जवान, जय किसान’ पण मोदीजींचा नारा ‘मर जवान, मर किसान’ अशी सध्याच्या केंद्र सरकारची कामगिरी असल्याची टीका यावेळी आंदोलनकर्त्यांनी केली.
पुणे राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप म्हणाले, सध्याची सैन्यभरतीची प्रक्रिया अतिशय उत्तम दर्जाची असून यातून निवड झालेल्या अधिकारी आणि जवानांनी वेळोवेळी सीमेवर शौर्य गाजवून देशाचे रक्षण केले आहे. आपल्या हातून देशसेवा घडावी तसेच आपल्या कुटुंबाचा चरितार्थ ही चालावा अशा दुहेरी उद्देशातून देशभरातील अनेक युवक सैन्यदलामध्ये भरती होण्यासाठी वर्षानुवर्षे प्रयत्न करीत असतात. मात्र, केंद्र सरकारने जाहीर केलेल्या धोरणानुसार सैनिक भरती होणाऱ्या युवकांना फक्त चारच वर्षे नोकरी मिळणार असून सैन्यदलाच्या या कंत्राटीकरणामुळे त्याचे पुढील भवितव्य अंधःकारमय असणार आहे. एकीकडे बुलेट ट्रेन सारख्या अनावश्यक योजनांवर एक लाख कोटी रुपयांचा खर्च केला जातो.
अनेक उद्योगपती मित्रांची कर्जे मोदी सरकारकडून रद्द केली जातात. पण दुसरीकडे देशाच्या संरक्षणाकरता पैसे शिल्लक नाही, असे सांगितले जाते. यातूनच ते देशाच्या संरक्षण क्षत्राविषयी गंभीर नाहीत हेच दिसत आहे , देशातील सार्वजनिक उपक्रम मोडीत काढताना ते पन्नास वर्षे शंभर वर्षे एवढ्या मोठ्या काराराने भाड्याने दिले जातात. मात्र, गोरगरीब युवकांना पूर्णवेळ नोकरी न देता तो कालावधी मात्र फक्त चारच वर्षांचा असतो. यामागे सरकारची व्यापारी मानसिकता दिसून आलेली आहे, अशी टिका यावेळी पक्षाकडून करण्यात आली.
याप्रसंगी शहराध्यक्ष प्रशांत जगताप , प्रवक्ते प्रदीप देशमुख रवींद्र माळवदकर, किशोर कांबळे मृणालिनी वाणी ,अजिंक्य पालकर ,मनोज पाचपुते, गोविंद जाधव , पुजा झोळे ,राहूल तांबे , सुगंधा तिकोणे,मंगेश मोरे, धनंजय पायगुडे, वंदना मोडक, आदिल सय्यद , विकास झेंडे व इतर कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.