आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराभाडेकरूच्या मुजोरीला कंटाळून आर्थिक विवंचनेत सापडलेल्या वृद्ध दाम्पत्याने गेल्या महिन्यात गांधीवादी मार्गाने लाक्षणिक उपोषण आंदोलन करत 'भाडेकरू, आम्हाला आमचं घर देता का घर?' अशी आर्त हाक दिली होती.
आंदोलनाची माध्यमांनी, तसेच सामाजिक कार्यकर्ते वसंत मोरे यांनी दखल घेत मध्यस्थी केली. आमदार नितेश राणे आणि आमदार दिलीप मोहिते यांनीही फोनवरून संवाद साधला. परिणामी, या वृद्ध फाटक दाम्पत्याला आपल्या स्वतःच्या घराचा कायदेशीर ताबा मिळाला.
बिबवेवाडीतील आपल्याच घरासमोर बसून उपोषण करण्याची वेळ सत्तरीतल्या डॉ. अविनाश फाटक व माधुरी फाटक या वृद्ध दांपत्यावर आली होती. फाटक दाम्पत्याने सदानंद सोसायटीतील आपला 'सरस्वती' हा बंगला आतिश जाधव यांना पाच वर्षांच्या भाडेकरारावर 'किडझी' हे नर्सरी स्कुल चालवण्यासाठी दिला होता. मात्र, गेल्या साडेतीन वर्षांपासून जाधव यांनी भाडे न देता फाटक दाम्पत्यास वेठीस धरले होते. याबाबत त्यांनी न्यायालयात धाव घेतली होती. मात्र, त्यावर निर्णय होत नसल्याने त्यांची ससेहोलपट सुरु होती.
या सगळ्या त्रासाला कंटाळून फाटक दाम्पत्याने गेल्या महिन्यात लाक्षणिक उपोषण केले. एका भाडेकरूच्या विरोधात घरमालकाने आंदोलन करण्याची ही कदाचित पहिलीच वेळ असावी. इलेक्ट्रॉनिक व प्रिंट माध्यमांनी हा संवेदनशील विषय उचलून धरला. त्यानंतर सामाजिक कार्यकर्ते व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते वसंत मोरे यांनी मध्यस्थी करत अतिश जाधव यांच्याकडून बंगल्याचा ताबा फाटक दाम्पत्याला दिला.
याबाबत बोलताना डॉ. अविनाश फाटक म्हणाले, आमच्या या लढ्याला माध्यमांनी व मोरे यांनी, तसेच आमची मुलगी सुप्रिया आणि जावई डॉ. असित अरगडे यांनी मोलाची साथ दिली. त्यांच्या पाठिंब्यामुळेच आज आम्हाला स्वतःच्या घरात राहण्याची संधी मिळाली आहे. गेल्या तीन-चार वर्षात झालेला सगळा त्रास विसरून आम्ही आनंदाने आमच्या घरात आलो आहोत. प्रिंट व इलेक्ट्रॉनिक माध्यमे, मोरे, तसेच शेजारील लोक आणि असंख्य हितचिंतकांच्या पाठिंब्याबद्दल आम्ही दोघेही सर्वांचे आभार व ऋण व्यक्त करतो.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.