आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामित्र-मैत्रिणींसह प्रियेसीवर इंप्रेशन मारणे एका तरुणाला चांगलेच महागात पडले आहे. इंप्रेशन मारण्यासाठी डिलिव्हरी बॉयने चक्क पोलीस कर्मचाऱ्यांचा ड्रेस घालून नदी पात्राच्या ठिकाणी असलेल्या रस्त्यावर थांबला.
मात्र, खऱ्या पोलिसांना खासगी कारने पेट्रोलिंग दरम्यान संबंधित तोतया पोलीस कर्मचारी दिसून आल्याने त्यांनी त्याच्याजवळ जाऊन, त्याची चौकशी करत त्याच्यावर प्रश्नांची सरबत्ती केल्याने तो बनावट पोलिस असल्याचे बिंग फुटले आणि तो पोलिसांच्या जाळ्यात अडकल्याचा प्रकार घडला आहे.
याप्रकरणी यशवंत रमेश धुरी (वय- 30, राहणार- तापकीरनगर ,काळेवाडी, पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे . याप्रकरणी पोलीस हवलदार श्रीकांत किसन वाघवले ( वय - 43) यांनी आरोपी विरोधात चतुर्शिंगी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
नक्की घडले काय?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस हवलदार श्रीकांत वाघवले हे चतुर्शिंगी पोलीस ठाण्यात नेमणुकीस आहे. रविवारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास ते स्वतः पोलीस उपनिरीक्षक एस महाडिक आणि पोलीस नाईक एन मुळे यांच्यासोबत खाजगी वाहनाने पेट्रोलिंग करत होते. यादरम्यान, त्यांना औंध परिसरात राम नदीच्या पुलावर नागरस रोड या ठिकाणी तोतया पोलीस खाकी ड्रेस घालून उभा असलेला दिसला.
त्यामुळे पोलिसांनी त्याच्या जवळ जाऊन त्याच्याकडे विचारपूस केली असता, त्यानी पोलिस असल्याचे सांगून सरकारी कर्मचारी असल्याचे सांगितले. अशाप्रकारचा समज व्हावा या उद्देशाने पोलिसांची वर्दी ही त्याने परिधान केलेली होती. मात्र, संबंधित तोतायाने आपण औंध पोलीस चौकीत नेमणुकीस असल्याचे सांगितले, तसेच त्याच्या ड्रेस वरील खांद्यावर लावलेला बिल्ला हा महाराष्ट्र पोलीस अशाप्रकारचा होता आणि पायात चप्पल होती तसेच त्यानी घातलेली टोपी याच्यावर पिंपरी चिंचवड पोलीस असे लिहिण्यात आलेले होते.
बोगस असल्याचे उघड
त्यामुळे संबंधित इसम हा बोगस असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. त्यामुळे त्याला चतुर्शिंगी पोलीस ठाण्यात आणून त्याची सखोल चौकशी केली असता, त्याचे बिंग फुटले आणि त्याने आपण खरे पोलिस नसल्याचे कबुली दिली आहे. मित्र-मैत्रिणींवर इम्प्रेशन टाकण्यासाठी आपण पोलिसांचा ड्रेस परिधान केल्याचे त्याने यावेळी सांगितले आहे. याबाबत पुढील तपास चतुर्शिंगी पोलीस करत आहेत.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.