आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

युरोलॉजीवर आंतरराष्ट्रीय कार्यशाळा:मूत्राशय मार्गाच्या स्वास्थ्यासाठी 'युरेथ्रोप्लास्टी' वरदान : डॉ. संजय कुलकर्णी

पुणे3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

अपघातात तुटलेला लघवीचा मार्ग जोडणे, आक्रसलेला मूत्रमार्ग मोठा करणे, मूत्रमार्गातील अडथळा काढणे, लघवीचा मार्ग शेंड्याऐवजी अंडकोशाजवळून असेल, तर तो नीट करणे, यासह लिंगाची वक्रता दूर करणे, कृत्रिम उपकरणाच्या साहाय्याने ताठरता आणणे अशा मूत्राशय मार्गाच्या स्वास्थ्यासाठी 'युरेथ्रोप्लास्टी' वरदान ठरत आहे,असे प्रतिपादन युरोलॉजिकल सोसायटी ऑफ इंडियाचे अध्यक्ष डॉ. संजय कुलकर्णी यांनी केले.

बाणेर येथील युरोकुल युरॉलॉजी इन्स्टिट्यूट आणि इंटरनॅशनल सोसायटी ऑफ रिकंस्ट्रक्टिव्ह युरोलॉजी यांच्या वतीने मूत्राशय मार्गाच्या किचकट शस्त्रक्रियांची दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय कार्यशाळा झाली. युरोकुल येथे डॉ. संजय कुलकर्णी यांच्या नेतृत्वात लंडनचे तज्ज्ञ डॉक्टर प्रा. टोनी मंडी, कॅनडातील प्रा. पीपी साले, युरॉलॉजिस्ट डॉ. पंकज जोशी, डॉ. श्रेयस बदरवार यांनी या शस्त्रक्रिया केल्या. बंटारा भवन येथे या शस्त्रक्रियांचे थेट प्रक्षेपण करण्यात आले. जगभरातून आलेला ५०० युरॉलॉजिस्टने या शस्त्रक्रिया ' पाहिल्या.

डॉ. संजय कुलकर्णी म्हणाले, लघवीच्या तुटलेल्या मार्गाला जोडणाऱ्या, मार्गातील अडथळा दूर करणाऱ्या, नपुसंकता दूर करणारी, दोन लहान मुलांच्या लिंगावरील शस्त्रक्रिया अशा दोन दिवसांत एकूण १५ शस्त्रक्रिया करण्यात आल्या. थेट प्रक्षेपणावेळी अनेक युरॉलॉजिस्टनी विचारलेल्या शंकांचे समाधान झाले. मूत्राशयाच्या आजारांबाबत उघडपणे बोलले जात नाही. तसेच यावरील उपचारांबद्दल फारशी माहिती नसल्याने लोकांना त्रास सहन करावा लागतो. परंतु, अशा शस्त्रक्रिया करणारे अनेक युरॉलॉजिस्ट तयार व्हावेत, या उद्देशाने ही कार्यशाळा आयोजिली होती.

प्रा. टोनी मंडी व प्रा. पीपी साले म्हणाले, की, पूर्वी मूत्रमार्ग मोठा करण्यासाठी दुर्बिणीच्या सहाय्याने शस्त्रक्रिया, स्वतः नळी घालून उपाययोजना कराव्या लागत. आता 'युरेथ्रोप्लास्टी'च्या शस्त्रक्रियेमुळे रुग्णांचे जीवन सुसह्य झाले आहे. 'युरेथ्रोप्लास्टी'मुळे मूत्राशय आणि संबंधित विकारांच्या रुग्णांना मोठा दिलासा मिळाला आहे. काही मुलांना जन्मतःच मूत्रविसर्गाची जागा शिश्नाच्या खालील बाजूस असते. अशा रुग्णांसाठीसुद्धा अद्ययावत शस्त्रक्रिया उपलब्ध आहे. लैंगिक जीवन सुधारण्यासाठी रुग्णाच्या शरीरात 'थ्री पीस पिनाईल प्रोस्थेसिस' बसवून त्याची शक्ती वाढवली जाते.