आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महाराष्ट्र साहित्य परिषदेची दिवाळी अंक स्पर्धा:निकाल जाहीर; शब्दमल्हार, नवल, उद्याचा मराठवाडा, पुणे पोस्ट हे मानकरी

पुणे11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

दिवाळी अंक ही खास मराठी साहित्य विश्वाने निर्माण केलेली खासियत आहे. मराठी दिवाळी अंकाला 110 वर्षांहून दीर्घ परंपरा आहे. दरवर्षी मराठीमध्ये सुमारे 450 दिवाळी अंक प्रकाशित होतात. अत्याधुनिक तंत्रज्ञान विकसित झाल्याने डिजिटल माध्यमातूनही दिवाळी अंक प्रकाशित केले जातात. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र साहित्य परिषदेतर्फे उत्कृष्ट दिवाळी अंकांना पुरस्कार दिले जातात.

महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणेतर्फे घेण्यात आलेल्या दिवाळी अंक स्पर्धा (२००२) चा निकाल शुक्रवारी जाहीर करण्यात आला आहे. या स्पर्धेसाठी यावर्षी संपूर्ण महाराष्ट्रातून १५० हून अधिक दिवाळी अंक आले होते. अ. स. गोखले स्मृत्यर्थ 'रत्नाकर पारितोषिक' 'नवल' या दिवाळी अंकाला, चंद्रकांत शेवाळे पुरस्कृत 'विविध ज्ञानविस्तारकर्ते रावसाहेब मोरमकर पारितोषिक' 'शब्दमल्हार' या दिवाळी अंकाला, 'मासिक मनोरंजनकार का. र. मित्र पारितोषिक' 'उद्याचा मराठवाडा' या दिवाळी अंकाला, ' शं. वा. किर्लोस्कर पारितोषिक' 'पुणे पोस्ट' या दिवाळी अंकाला, त्याच बरोबर कै. विमल कचरू भालेराव स्मृतिप्रीत्यर्थ ऑनलाईन दिवाळी अंकाचे पारितोषिक 'गिताई' दिवाळी अंकाला जाहीर करण्यात आले आहे.

जानकीबाई केळकर स्मृत्यर्थ 'उत्कृष्ट बालवाङमय पारितोषिक' 'जीवन शिक्षण' या दिवाळी अंकाला, दिवाळी अंकातील उत्कृष्ट कथेसाठी 'दि. अ. सोनटक्के पारितोषिक' 'सह्याचल' या दिवाळी अंकातील संध्या सोळंखे-शिंदे यांच्या 'माऊली' या कथेला, तर उत्कृष्ट ललित लेखासाठीचे 'अनंत काणेकर पारितोषिक' 'शब्दरुची' या दिवाळी अंकातील सुरेश लोटलीकऱ यांच्या 'निशब्द व्यंगचित्रांचा महर्षी' या लेखाला जाहीर करण्यात आले आहे, या स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून डॉ. अविनाश सांगोलेकर, अनिल गुंजाळ आणि डॉ. प्रतिमा जगताप यांनी काम पाहिले.

या स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ सोमवार, दि. १३ मार्च २०२३ रोजी सायंकाळी ६.०० वा. म. सा. परिषदेच्या माधवराव पटवर्धन सभागृहात ज्येष्ठ साहित्यिक राजन खान यांच्या हस्ते आणि महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. अशी माहिती ग्रंथालय विभागाचे कार्यवाह वि. दा. पिंगळे यांनी दिली.

बातम्या आणखी आहेत...