आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा२००५ सालापासून मी माझी मुलगी पंचशील आश्रमामध्ये राहत आहोत. माझे पती सरपंच होते, ते गावाचा विकास करण्यासाठी प्रयत्नशील होते त्यामुळे नक्षलवाद्यांनी आमच्या घराला एक दिवशी घेराव घालून माझे पती माझा भाऊ आणि अन्य व्यक्तींना गावाच्या चौकात नेऊन त्यांचे गळे चिरले आणि त्यातून सांडत असलेले रक्त बाटलीत भरून तेथील नक्षलवाद्यांच्या स्मारकावर ओतले. त्यानंतर माझ्या मुलाचे आणि माझे जीवन जगणे कठीण झाले. त्यामुळे आम्ही गाव सोडून के.मधुकर राव यांनी सुरू केलेल्या पंचशील आश्रमात राहू लागलो असे मत नक्षलवादी हल्ल्यात पीडित पुष्पा वसंत गावडे यांनी व्यक्त केले आहे.
विवेक विचार मंच, राजे शिवराय प्रतिष्ठान व लोकशाही जागर मंच यांच्या वतीने विशेष संवाद कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता."सलवा जुडूम" या नक्षल विरोधी मोहीमेचे नेते के.मधुकर राव यांचे नुकतेच निधन झाले. त्यांना यावेळी श्रद्धांजली वाहण्यात आली.या
कार्यक्रमासाठी छत्तीसगड मधील बिजापूर जिल्ह्यातील गुंटूर येथून के.मधुकर राव यांनी सुरू केलेल्या पंचशील आश्रम या संस्थेचे अध्यक्ष राहुल मारगुनी, सचिव पुरुषोत्तम साहा, योगेश शाहू, ममता कोरसा व नक्षल पीडित महिला पुष्पा गावडे यांनी उपस्थितांशी संवाद साधला.
संस्थेचे अध्यक्ष राहुल मार्गोनी म्हणाले की, के. मधुकर राव यांनी एक लाख रुपये प्रति महिन्याची नोकरी सोडून नक्षलग्रगस्त भागातील मुलांसाठी काम केले. ते सलवा जुडुम मोहिमेत सक्रियपणे काम करत होते म्हणून २००५ मद्ये त्यांच्या घराला ३००-३५० नक्षलवाद्यांनी घेराव घालुन घरातील मंडळींना त्रास दिला. तरी के.मधुकर राव यांनी आपले काम थांबवले नाही. सलवा जुडुममध्ये सहभाग घेतल्यामुळे ज्या लोकांना गाव सोडावे लागले. त्यांना शासकीय पातळीवर प्रयत्न करून के. मधुकर रावांनी 'स्पेशल पोलीस' असे पद निर्माण करून दोन हजार लोकांना नोकरी द्यायला लावली. त्यासाठी त्यांनी कित्येक आंदोलन केली आणि मोर्चे काढले.
यावेळी राव यांचे सहकारी पुरुषोत्तम साहा म्हणाले की, सलवा जुडूम चालू होण्याच्या आधी जून २००४ मध्ये एक अघोषित युद्ध सुरू झाले होते. दोन्ही बाजूंनी संघर्ष चालू होता. नक्षलवाद्यांकडून आणि जनतेकडूनही पण जनसामान्यापुढे रोजी रोटीचा प्रश्न होता. राव यांच्यापुढे त्यांनी प्रश्न मांडले आणि त्यांनी ते रचनात्मक पद्धतीने सोडवण्यासाठी दिशा दिली. त्यानंतर सलवा जुडुमवर सर्वोच्च न्यायालयाने बंदी घातली. त्यानंतर या आंदोलनात सहभागी झाल्यामुळे ठार झालेल्या व नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात मरण पावलेल्या लोकांच्या मुलांसाठी के.मधुकर राव यांनी शाळा सुरू करून 'छत्तीसगड समाज संस्था' आणि पंचशील आश्रम यांची स्थापना केली. सध्या पंचशील आश्रमात 55 मुले आणि 50 मुली शिक्षण घेतात.
यावेळी पंचशीला आश्रमाच्या व्यवस्थापक ममता कोरसा म्हणाल्या की, नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात ठार झालेल्या लोंकाची मुले इकडे तिकडे भटकतात. त्यांना एकत्रित करून त्यांची निवास, भोजन व शिक्षणाची सोय राव यांनी केली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.