आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुणे:देणगी रक्कम गरीब व होतकरू खेळाडूंच्या विकासासाठी खर्च करा- अर्जुन पुरस्कार विजेत्या सारिका काळे; उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते काळे यांना मानपत्र

पुणे8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

गरीब कुटुंबातील आणि खो-खो खेळाडू म्हणून राष्ट्रीय पातळीवर चमकले. त्यामुळेच देशातल्या सर्वोच्च अर्जुन क्रीडा पुरस्काराची मानकरी ठरले. याची जाण असल्यामुळेच मी महाराष्ट्र खो खो असोसिएशनला एक लाखाची देणगी दिली. गरीब व होतकरू खेळाडूंच्या विकासासाठी ही रक्कम खर्च करावी, अशी विनंती अर्जुन पुरस्कार विजेत्या सारिका काळे यांनी महाराष्ट्र खो-खो असोसिएशनला केली आहे.

पुण्यात पी.वाय.सी जिमखाना हॉलमध्ये झालेल्या या कार्यक्रमात महाराष्ट्र खो खो असोसिएशनचा वतीने सारिका सुधाकर काळे-खोत यांचा मानपत्र व त्यांच्या गुरू डॉ. चंद्रजित जाधव यांचा सत्कार उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते झाला. त्यावेळी त्या बोलत होत्या. त्या म्हणाल्या, "माझा चित्रपट निघणार आहे. त्या चित्रपटातून मिळणारा निधी मी महाराष्ट्र खो खो असोसिएशनला देणार आहे. त्यातील एक लाखाचा निधी उपमुख्यमंत्री पवार यांच्याकडे यावेळी सुपूर्त करीत आहे."

यावेळी उपमुख्यमंत्री पवार यांच्या हस्ते महाराष्ट्राच्या कुमार व मुली संघाने सलग ७ व्या वर्षी दुहेरी मुकुट मिळविल्याबद्दल दोन्ही संघातील खेळाडू, प्रशिक्षक व व्यवस्थापक यांचा प्रत्येकी २१ हजार रुपयांचा धनादेश देऊन सत्कार करण्यात आला.

यावेळी व्यासपीठावर महाराष्ट्र खो खो असोसिएशनचे अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर, सरचिटणीस गोविंद शर्मा, कार्याध्यक्ष सचिन गोडबोले, खजिनदार अरुण देशमुख, आमदार अनिकेत तटकरे, आमदार अभिमन्यू पवार, अर्जुन पुरस्कार विजेते श्रीरंग इनामदार आदी उपस्थित होते.

बारामतीमध्ये खो खोची राष्ट्रीय स्पर्धा घेण्याचा मानस -

बारामतीमध्ये खो खो राष्ट्रीय स्पर्धा घेण्याचा मानस आहे, असे सांगून उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, गाव तेथे खो-खो मैदान ही आमदार अभिमन्यू पवार यांनी मांडलेली संकल्पना चांगली आहे. क्रीडा खात्यासाठी मी भरघोस निधी दिला आहे, देत आहे. आमदार निधी आणि जिल्हा विकास नियोजन निधीतून निधी देताना खेळासाठी निधी खर्च करा, अशा सूचना मी दिल्या आहेत. सारिका काळे यांनी खो-खोच्या विकासासाठी देणगी दिली, ही बाब कौतुकास्पद आहे, असे मदत करणारे फार कमी असतात." असेही पवार म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...