आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पुणे:सुसाइड नोट लिहून बेपत्ता झालेले पाषाणकर अखेर सापडले जयपुरात, 21 ऑक्टोबरला ड्रायव्हरजवळ दिली होती सुसाइड नोट

पुणे2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
पोलिसांसमवेत उद्योजक गौतम पाषाणकर. - Divya Marathi
पोलिसांसमवेत उद्योजक गौतम पाषाणकर.
  • राजकीय पदाधिकाऱ्यांवर मुलाने घेतला होता संशय

पुण्यातील नामांकित पाषाणकर ऑटाेमाेबाइलचे मालक उद्योजक गाैतम पाषाणकर हे व्यवसायातील काही अडचणींमुळे २१ ऑक्टाेबर राेजी आत्महत्या करत असल्याची चिठ्ठी कारचालकाजवळ घरी पाठवून गायब झाले हाेते. त्यानंतर ते बेपत्ता झाल्याची तक्रार पाषाणकर यांच्या मुलाने दिल्यावर पाेलिसांनी मागील महिनाभरापासून त्यांचा युद्धपातळीवर शाेध सर्वत्र सुरू केला हाेता. परंतु ते सापडत नव्हते. अखेर ३४ दिवसांनंतर गुन्हे शाखेच्या युनिट एकच्या पथकास मिळालेल्या माहितीद्वारे ते जयपूरमध्ये एका हॉटेलात मंगळवारी दुपारी सुखरूप सापडले. दरम्यान, पाेलिस त्यांना पुण्यात घेऊन येत असल्याची माहिती गुन्हे शाखेचे पाेलिस उपायुक्त बच्चन सिंग यांनी दिली.

पाषाणकर यांचा मुलगा कपिल पाषाणकर याने शिवाजीनगर पाेलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार, व्यवहारातील आर्थिक देवाणघेवाणीची संपूर्ण माहिती पाेलिसांनी करून घेतली असता, त्यांच्या मुलाने राजकीय पदाधिकाऱ्यांसह काही जणांवर संशय व्यक्त केला हाेता. त्यानुसार पाेलिसांनी संबंधित व्यक्तींकडे विचारणा केलेली हाेती. २१ आॅक्टाेबर राेजी दुपारी साडेबारा वाजता पाषाणकर हे लाेणीकाळभाेर येथील त्यांच्या गॅस एजन्सीच्या ठिकाणी तर दुपारी चार वाजेच्या सुमारास जंगली महाराज रस्त्यावरील पेणकर ऑटाे कार्यालयात आले हाेते. त्यानंतर गणेशखिंड रस्त्यावर त्यांनी चालकास सोडण्यास सांगून त्याच्या हातात एक चिठ्ठी देऊन ती घरी देण्यास सांगितली हाेती. ती चिठ्ठी पत्नीने उघडून पाहिली असता, त्यात मागील काही दिवसांपासून व्यवसायात माेठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने तणावाखाली असल्याने मी आत्महत्या करत आहे, असे लिहिलेले होते. त्यानंतर कुटुंबीयांनी त्यांना फाेन लावला असता ताे बंद येत हाेता. तसेच कोणत्याही नातेवाइकाकडे ते आढळले नाही. पुणे शहरातून बेपत्ता झाल्यानंतर पाषाणकर यांना शाेधण्याकरिता पाेलिसांनी शहरातील विविध भागांतील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली असता, पुण्यातील सेंट्रल बिल्डिंगजवळ एका नारळ विक्रेत्यापाशी ते काही काळ थांबल्याचे दिसून आले हाेते. मात्र, त्यानंतर त्यांचा ठावठिकाणा लागत नव्हता. दुसरीकडे, गुन्हे शाखा या गुन्ह्याचा समांतर तपास करत असताना, युनिट एकच्या पथकाचे पाेलिस निरीक्षक कमलाकर ताकवले यांना पाषाणकर हे सध्या जयपूरमध्ये असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पाेलिसांचे एक पथक तत्काळ जयपूरकडे रवाना झाले व मंगळवारी दुपारी तीन वाजता त्यांनी पाषाणकर यांना ताब्यात घेतले. दरम्यान, बेपत्ता हाेण्यामागील नेमके कारण काय? यादरम्यान ते कुठे कुठे फिरले? कुणाकुणाच्या संपर्कात आले? याचा तपास पुणे पाेलिस करणार आहेत.

कोल्हापुरात हॉटेलच्या सीसीटीव्हीत दिसले होते

पाेलिसांनी पाषाणकरांच्या शाेधाकरिता राज्यभरात शाेधमाेहीम राबवली असता, काेल्हापुरात एका हाॅटेलमध्ये ते राहिले असल्याचे पाेलिसांना समजले. त्यानुसार सीसीटीव्ही फुटेज पाषाणकर यांच्या कुटुंबीयांना दाखवले असता, त्यांनीदेखील त्यांना आेळखले व पाेलिसांचे पथक काेल्हापुरात दाखल झाले हाेते. परंतु, त्यापूर्वीच पाषाणकर काेल्हापूर साेडून गेले हाेते. काेकणात ते गेले असावेत, असा अंदाज पाेलिसांना आल्याने त्यांनी काेकणात पाषाणकर यांचा शाेध घेतला. मात्र, ते सापडले नाही.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser