आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महावितरण 'गो-ग्रीन':पुणे परिमंडलाची राज्यात आघाडी, 1 लाख 7 हजार  ग्राहकांची एक कोटी 20 लाखांची बचत

पुणे16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • P

वीजबिलांसाठी छापील कागदाचा वापर पूर्णपणे बंद करीत केवळ 'ई-मेल' व 'एसएमएस'चा पर्याय निवडणाऱ्या पुणे परिमंडलातील पर्यावरणस्नेही वीजग्राहकांनी एक लाखाचा टप्पा गाठला आहे. महावितरणच्या 'गो-ग्रीन' योजने अंतर्गत पुणे परिमंडलाने राज्यात आघाडी घेतली असून या योजनेमुळे एक लाख सात हजार वीजग्राहकांची तब्बल एक कोटी 20 लाख 840 रुपयांची वार्षिक बचत होत आहे.

गेल्या फेब्रुवारीपासून या योजनेमध्ये सहभाग नोंदविणाऱ्या पर्यावरणस्नेही ७ हजार १९४ वीजग्राहकांची भर पडली आहे. राज्यात 3 लाख 87 हजार 757 वीजग्राहकांनी गो-ग्रीन योजनेत सहभाग घेतला आहे. यामध्ये पुणे परिमंडलामध्ये सर्वाधिक 1 लाख 7 त्यानंतर कल्याण 42 हजार 214 व भांडूप परिमंडलामध्ये 37 हजार 396 ग्राहक या योजनेत सहभागी झाले आहेत.

प्रतिबिलात दहा रुपये सवलत

महावितरणच्या 'गो-ग्रीन' योजनेनुसार छापील वीजबिलाच्या कागदाऐवजी फक्त 'ई-मेल' व 'एसएमएस'चा पर्याय निवडल्यास प्रतिबिलात दहा रुपये सवलत देण्यात येत आहे. त्यामुळे योजनेत सहभागी ग्राहकांची वीजबिलांमध्ये वार्षिक 120 रुपयांची बचत होत आहे.

वीजबिल तयार झाल्यानंतर लगेचच संगणकीय प्रणालीद्वारे ते 'गो-ग्रीन'मधील ग्राहकांना 'ई-मेल'द्वारे पाठविण्यात येत आहे. सोबतच 'एसएमएस'द्वारे देखील वीजबिलाची माहिती देण्यात येत आहे.

या परिमंडळांचा समावेश

पुणे परिमंडल अंतर्गत पुणे शहरात 53 हजार 273 ग्राहक 'गो-ग्रीन' योजनेत सहभागी झाले आहेत. यामध्ये हडपसर-1 उपविभागामधील 6 हजार 50, वडगाव धायरी- 5 हजार 184, धनकवडी– 4 हजार 900, औंध- 4 हजार 365 आणि विश्रांतवाडी उपविभागामध्ये 3 हजार 857 ग्राहकांची संख्या लक्षणीय आहे. पिंपरी चिंचवड शहरात 'गो-ग्रीन'मध्ये 29 हजार 205 वीजग्राहक सहभागी झाले आहेत.

हडपसर ग्रामीण उपविभागाची सर्वाधिक संख्या

यामध्ये सांगवी उपविभागातील सर्वाधिक 9 हजार 42, चिंचवड 5 हजार 661 आणि आकुर्डी 5 हजार 525 मोठ्या संख्येने योजनेत सहभागी आहेत. तसेच पुणे ग्रामीण मंडल अंतर्गत आंबेगाव, जुन्नर, खेड, मावळ, मुळशी, वेल्हे व हवेली तालुक्यामध्ये 17 हजार 529 ग्राहकांनी 'गो-ग्रीन'मध्ये सहभाग घेतला आहे. यामध्ये हडपसर ग्रामीण उपविभागातील 4 हजार 712 वीजग्राहकांची सर्वाधिक संख्या आहे.

जास्त वीजग्राहकांनी सहभागी व्हा

पुणे परिमंडळ चे मुख्य अभियंता राजेंद्र पवार म्हणाले, समृद्ध पर्यावरणासाठी 'गो-ग्रीन' योजना काळाची गरज आहे. ग्राहकांसाठी चालू व मागील वीजबिल, भरणा तसेच मासिक वीज वापर आदींची माहिती महावितरण मोबाईल ऍप व वेबसाईटवर उपलब्ध आहे. त्यामुळे कागदी मासिक बिलाचा वापर बंद करून या योजनेत आणखी जास्तीत जास्त वीजग्राहकांनी सहभागी व्हावे.