आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासायबर शाखेत काम करत असताना एकाकडे ३०० कोटी रुपयांचे बिटकॉइन (क्रिप्टोकरन्सी) असल्याचा समज करून पोलिस कर्मचाऱ्याने प्लॅन बनवला. बनवलेल्या प्लॅननुसार एकाचे अपहरण करून त्याला कोकणात नेले. मात्र, पोलिस मागावर असल्याचे लक्षात आल्यानंतर त्याला सोडून देण्यात आले. वाकड पोलिसांनी तपास करून पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयातील मुख्यालयात असणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्यांसह आठ जणांना अटक केली आहे.
विनय सुंदरराव नाईक (रा. ताथवडे) असे अपहरण आणि सुटका झालेल्याचे नाव आहे, तर मास्टरमाइंड पोलिस कर्मचारी दिलीप तुकाराम खंदारे, सुनील राम शिंदे, वसंत शामराव चव्हाण, फ्रान्सिस डिसुझा, मयूर महेंद्र शिर्के, प्रदीप काशीनाथ काटे, शिरीष खोत, संजय ऊर्फ निकी रमेश बन्सल या आठ जणांना अटक केली आहे. आरोपींनी विनय सुंदरराव नाईक (रा. ताथवडे) यांचे १४ जानेवारी रोजी ताथवडे येथील एका हॉटेलमधून अपहरण केले होते. याप्रकरणी रफिक अल्लाउद्दीन सय्यद (३८) यांनी वाकड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्यानुसार पोलिसांनी तपासाची सूत्रे हलवत आरोपींचा माग काढण्यास सुरुवात केल्याचे संगण्यात आले.
नाईक यांना वाकडमध्ये सोडून आरोपी पसार
पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी दिलेल्या माहितीनुसार, १४ जानेवारी रोजी नाईक हे ताथवडे येथील एका हॉटेलमध्ये असताना त्यांचे सात ते आठ अनोळखी लोकांनी अपहरण केले. याबाबत नाईक यांचे मित्र सय्यद यांनी वाकड पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी तत्काळ गुन्हा दाखल करत दोन पथके तयार केली. पोलिसांनी घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज गोळा करत तांत्रिक विश्लेषण सुरू केले. पोलिस आपल्या मागावर असल्याची कुणकुण आरोपींना लागली.
त्यांनी नाईक यांना वाकड भागात सोडले आणि ते पळून गेले. आरोपींनी बिटकॉइन व आठ लाख रुपयांची मागणी केल्याचे नाईक यांनी पोलिसांना सांगितले. दरम्यान, राज्यभरात शेअर मार्केट आणि इतर माध्यमातून ऑनलाइन फसवणुकीचे प्रकार मोठ्या प्रमाणात उघडकीस येत आहेत. त्यामुळे पोलिसांसमोरील आव्हान आता वाढले आहे.
आरोपी पोलिसाने घेतले हायटेक शिक्षण
पोलिस शिपाई दिलीप तुकाराम खंदारे हा पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालय पोलिस शिपाई पदावर कार्यरत आहे. सध्या तो कर्तव्यावर गैरहजर होता. तो पूर्वी पुणे शहर पोलिस दलात कार्यरत होता. तिथे तो सायबर विभागात काम करत असताना त्याने सेवांतर्गत ऑफिस ऑटोमेशन, सायबर गुन्हे प्रणाली, अॅडव्हान्स सायबर क्राइम इन्व्हेस्टिगेशन टेक्नॉलॉजी, बेसिक ऑफ हार्डवेअर अँड नेटवर्क इन्फर्मेशन, मोबाइल फॉरेन्सिक असे कोर्स केले आहेत.
तो सायबर क्राइम विभाग पुणे शहर येथे नेमणुकीस असताना त्याला विनय सुंदरराव नाईक यांच्याकडे एकूण ३०० कोटी रुपयांची बिटकॉईन ही क्रिप्टोकरन्सी असल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर त्याने विनय नाईक यांचे अपहरण करून पैसे उकळण्याचा डाव आखला होता. मात्र, अपहरणानंतर नाईक यांच्याकडे एवढ्या मोठ्या रकमेचे बिटकॉइन नसल्याचे समजले.
अलिबागला डांबून ठेवले
वाकड पोलिसांनी आरोपींचा माग काढत मुंबई गाठली. तिथून चार जणांना ताब्यात घेत त्यांनी अपहरणाची वापरलेली कार पोलिसांनी जप्त केली. अटक केलेल्या आरोपींनी प्रदीप काटे आणि दिलीप खंदारे यांच्या सांगण्यावरून राजेश बन्सल आणि शिरीष खोत यांच्यासोबत मिळून हा गुन्हा केल्याची कबुली दिली. नाईक यांचे अपहरण करून त्यांना अलिबाग येथील एका हॉटेलमध्ये डांबून ठेवले आणि त्यांच्याकडे आठ लाख रुपयांची मागणी केली. अन्य तिघांना पोलिसांनी अटक केली. या प्रकरणाचा मास्टरमाइंड दिलीप खंदारे असल्याचे आरोपींनी सांगितले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.