आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आंबिल ओढ्याचा वाद पेटला:पुण्यातील स्थानिकांकडून सामूहिक आत्मदहनाचा प्रयत्न, बिल्डरच्या फायद्यासाठी घरे पाडली जात असल्याचा आरोप; शेकडो पोलिसांचा फौजफाटा तैनात

पुणेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

पुण्यात अतिक्रमण विरोधी मोहिमेत नागरिक आणि पोलिसांमधील वाद उफाळून आला. घरे पाडण्याचे काम सुरू असतानाच नागरिकांनी कडवा विरोध केला. त्यातील 5 ते 6 जणांनी अंगावर रॉकेल ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. पुण्यातील आंबिल ओढा परिसरात अतिक्रमण हटवण्याच्या नावे बिल्डरांना फायदा पोहोचवण्याचा घाट सुरू आहे असा आरोप स्थानिकांनी केला. यानंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी जवळपास 700 ते 800 पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.

आंबिल ओढ्याबद्दल
आंबील ओढ्याचा उगम कात्रज तलावापासून होतो. या ओढ्याला ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे. पेशवाईच्या काळात आंबील ओढ्याला पुण्याची पश्चिमेकडील सीमा म्हटले जायचे. याच ओढ्याच्या काठी जागृत जोगेश्वरी मंदिर देखील होते.

स्थानिक काय म्हणाले?
स्थानिकांनी केलेल्या आरोपांप्रमाणे आंबिल ओढ्याचा नैसर्गिक प्रवाह केवळ बिल्डरच्या फायद्यासाठी वळवण्याचे काम सुरू आहे. यासाठी बळजबरीने स्थानिकांची घरे पाडण्याचे काम प्रशासन करत आहे. याच दरम्यान, पोलिसांच्या मोठ्या बंदोबस्तात गुरुवारी प्रशासनाने अतिक्रमण हटवण्याच्या मोहिमेला सुरुवात केली. पण, नागरिकांनी त्यास तीव्र विरोध करत आत्मदहनाचा प्रयत्न केला. यामुळे, परिसरात मोठी गर्दी झाली.

स्थानिकांनी माध्यमांना सांगितल्याप्रमाणे, प्रशासनाकडून भाडोत्री कामगार आणून येथील घरांमधील साहित्ये बाहेर फेकून देण्यात आली. विरोध केला तेव्हा पोलिसांनी स्थानिकांनाच ताब्यात घेतले. राजकीय नेते सुद्धा केवळ कारवाईचा खोटा निषेध करत आहेत. त्यांनी कारवाई थांबवायला हवी असे स्थानिकांनी सांगितले.

राजकीय नेते काय म्हणाले?
पुणे महापालिकेच्या माजी महापौर आणि भाजप आमदार मुक्ता टिळक यांनी या प्रकरणी राज्य सरकारकडे बोट दाखवला. पावसाळ्यात कारवाई होणार नाही असे महापालिकेतील सत्ताधारी भाजपने ठरवले होते. तरीही कारवाई का झाली हे राज्य सरकारशी चर्चा करून विचारले जाईल आणि प्रशासनावर कारवाई केली जाईल असे त्या म्हणाल्या.
प्रशासनाने कारवाई करावी की नाही हे महापौरांच्या आदेशावर असते. प्रशासन महापौरांचे ऐकते. त्यामुळे, सत्ताधारी भाजपने राज्य सरकावर आरोप करून हात झटकू नये अशी प्रतिक्रिया पुण्याचे आणखी एक माजी महापौर तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे अध्यक्ष प्रशांत जगताप यांनी दिली.
तर भाजप खासदार गिरीश बापट यांनी ओढ्याच्या प्रवाहात घरे असलेल्यांना पर्यायी घरे द्यावी असा सल्ला दिला. सोबतच, बिल्डरच्या जागेवर सुद्धा कारवाई झाली असून आधीच याबाबत सर्वांना नोटिसा देण्यात आल्या होत्या. ओढ्यात राहणे योग्य नाहीच. परंतु, अतिक्रमण हटवण्याची कारवाई करण्यापूर्वी पुनर्वसनाकडे सुद्ध महापालिकेने लक्ष द्यावे असे ते पुढे म्हणाले आहेत.

बातम्या आणखी आहेत...