आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धरपकड:पुणे पोलिसांनी 12 पिस्तुले व काडतुसे जप्त करून पाच आरोपींना केले गजाआड

पुणे14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे पोलिसांनी विविध तीन ठिकाणी केलेल्या कारवायांत तब्बल १२ पिस्तुले जप्त करून चार आरोपींना गजाआड केले आहे. पुण्यातील विमानतळ पाेलिस ठाण्याच्या हद्दीत पेट्राेलिंग पथकाने फाॅरेस्ट पार्क रस्त्याच्या जवळ एक जणास ३१ जुलै राेजी सायंकाळी पाच वाजता छापा टाकून पकडले. त्याच्याजवळ ३ लाख २६ हजार रुपये किमतीची पाच पिस्तुले आणि १४ काडतुसे मिळून आली, अशी माहिती विमानतळ ठाण्याचे वरिष्ठ पाेलिस निरीक्षक भरत जाधव यांनी साेमवारी दिली. राहुल गाेपाळ गवळी (३५, रा. बारीवाडा, ता. चाेपडा, जळगाव) असे अटक करण्यात आलेल्या आराेपीचे नाव आहे. त्याच्यावर विमानतळ पाेलिस ठाण्यात शस्त्र अधिनियम १९५९ चे कलम ३, २५, २९ व महाराष्ट्र पाेलिस अॅक्ट कलम ३७ (१) सह १३५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तीन पिस्तुले जप्त विनापरवाना पिस्तूल बाळगणाऱ्या राहुल रोहिदास जाधव (३१, रा. लक्ष्मीनगर, येरवडा, पुणे) यास येरवडा परिसरातील हिंदू स्मशानभूमीजवळ अटक करण्यात आली. त्याच्याकडून पिस्तुलासह काडतुसे जप्त केली. अधिक चौकशीत आणखी दोन पिस्तुले आणि दोन काडतुसे जप्त करण्यात आली आहेत, अशी माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक गणेश माने यांनी दिली आहे.

खुनाच्या प्रयत्नातील सराईत पिस्तुलासह जेरबंद
खुनाच्या प्रयत्नातील फरार सराईताला गुन्हे शाखेच्या युनिट एकने अटक केली. त्याच्याकडून एक पिस्तूल व ८ जिवंत काडतूसे जप्त केली आहेत. विशाल सज्जन फाळके (३०, रा. येरवडा, पुणे) असे अटक केलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. युनिट एकचे पथक हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना खुनाच्या प्रयत्नातील फरारी महानगरपालिका भवनाजवळ आल्याची माहिती पोलिस अमलदार नीलेश साबळे यांना मिळाली. त्यानुसार पथकाने सापळा रचून विशालला ताब्यात घेतले. ही कामगिरी वरिष्ठ पोलिस निरीक्षक संदीप भोसले, उपनिरीक्षक संजय गायकवाड, उपनिरीक्षक सुनील कुलकर्णी, अजय जाधव यांच्या पथकाने केली.

गुन्हे शाखेच्या दराेडा व वाहनचाेरीविराेधी पथकाने केली दाेन आराेपींकडून तीन पिस्तुले जप्त
गुन्हे शाखेच्या दराेडा व वाहनचाेरी विराेधी पथकाने मुंढवा व चंदननगर पाेलिस ठाण्याच्या हद्दीत गस्त घालत असताना पाेलिस अंमलदार उदय काळभाेर यांना मिळालेल्या माहितीनुसार, खराडीतील हाॅटेल शिवानंद येथे एका कारमध्ये दाेन जणांकडे पिस्तूल असून ते पिस्तूल विक्री करण्याकरिता वाट पाहत बसल्याचे कळाले. त्यानुसार पाेलिसांनी दाेन आराेपींना ताब्यात घेऊन त्यांच्या ताब्यातून सहा लाख २४ हजार रुपये किमतीची तीन गावठी बनावटीची पिस्तुले, नऊ काडतुसे व चार सुटे मॅगेझीन व कार असा मुद्देमाल जप्त केला आहे. अजय ऊर्फ महाराज कमलाकार भाेरे (२८, रा. मुंढवा, पुणे) व ओंकार प्रदीप कांबळे (२२, रा.काकरंबा, ता. तुळजापूर, उस्मानाबाद) अशी अटक करण्यात आलेल्या आराेपींची नावे आहेत.

बातम्या आणखी आहेत...