आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामागील काही दिवसांपासून पुण्यात गुन्हेगारी वाढताना दिसत असून घडणाऱ्या गुन्ह्यात अल्पवयीन आराेपींचा समावेश प्रामुख्याने पाेलिसांना दिसून आल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे गुन्हेगारीतील अल्पवयीन मुलांचे प्रमाण कमी करण्यासाठी पुणे पाेलिसांनी कडक पाउले उचलण्याचा निर्णय घेतला आहे. १६ ते १८ वयोगटातील मुले हिंसक गंभीर गुन्हेगारीत सापडल्यास त्यांना यापुढे सज्ञान आराेपी प्रमाणे वागणूक देऊन पुढील कायदेशीर कारवाई करण्याचे संकेत पुणे पाेलिसांनी दिले आहे.
भाईगिरीचे आर्कषण, झटपट पैसे मिळवणे, राहत्या परिसरात वर्चस्व निर्माण करणे, साेशल मीडियावर वेगळ्या प्रकारचे फाेटाे, व्हिडिआओ पाेस्ट करणे आदी कारणांमुळे अल्पवयीन मुले गुन्हेगारीकडे वळत असल्याचे पाेलीसांचे निदर्शनास आले आहे. त्याचप्रमाणे बदलत्या काळात पालकांचे मुलांकडे हाेणारे दुर्लक्ष आणि सहजरित्या हातातील माेबाईलवर उपलब्ध असणारे गुन्हेगारी व्हिडिआे, रिल्स, पाॅर्न फिल्म आदी कारणामुळे मुलांचे मानसिकतेवर परिणाम हाेऊन हिंसक भावना वाढीस लागत आहेत. किरकाेळ कारणावरून समाेरील व्यक्तीवर थेट शस्त्राने वार करण्याचे घटना ही घडत आहे. नुकतेच नववर्षाच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील चतुःशृंगी भागात १०० रुपये दिले नाही म्हणून चार जणांनी एका तरुणाचा हातावर काेयत्याने वार करून त्याचा हात मनगटापासून ताेडला. यात तीन अल्पवयीन मुलांचा सहभाग दिसून आला. दुसरीकडे शहराचे हडपसर, सिंहगड, वारजे, वानवडी, काेथरुड, उत्तमनगर, भारती विद्यापीठ अशा विविध भागात काेयत्याने मारहाणीचे प्रकरणात ही अल्पवयीन मुलांचा सहभाग प्रामुख्याने जाणवू लागला आहे. याशिवाय काेयता, तलवार, पिस्तुल अशी घातक शस्त्र हातात घेऊन त्याचे रिल्स बनवून ते साेशल मीडियावर टाकून टाेळीचे वर्चस्व वाढवण्याचे प्रकार घडू लागले. तर, काही ठिकाणी सराईत गुन्हेगार हे गुन्हेगारी कृत्य करण्यासाठी आणि कायद्याचे कचाटयातून सुटका हाेण्याकरिता मुलांचा जाणीवपूर्वक वापर गुन्हेगारीत करत आसल्याचे ही दिसून आले आहे. दरम्यान, पोलिसांनी घेतलेल्या निर्णयाचा कितपत फायदा होतो, हे येणाऱ्या काळामध्ये स्पष्ट होईल, असे काही पुण्यातील सामाजिक संस्थांचे म्हणणे आहे.
अल्पवयीन आराेपी बालसुधारगृहाऐवजी पाेलिस काेठडीत
पुण्यातील वाढत्या काेयता टाेळीच्या पार्श्वभूमीवर अल्पवयीन आराेपी विराेधात पाेलिसांनी सर्वोच्च न्यायालयाच्या २०१५ च्या कायद्यानुसार १६ ते १८ वयाेगटातील अल्पवयीन मुलांचा गंभीर गुन्ह्यात समावेश आढळल्यास सराईत गुन्हेगाराप्रमाणे त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे. त्यानुसार संबंधित अल्पवयीन आराेपींचे प्रत्येक पाेलिस स्टेशन हद्दीतील रेकाॅर्ड तयार करण्यात येणार आहे. हिंसक गुन्ह्यात त्यांचा सहभाग असल्यास त्यांना बालसुधारगृहात न पाठवता थेट पाेलिस काेठडीत रवानगी केली जाणार आहे. याबाबत पुणे पाेलिस आयुक्त रितेश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली पाेलिस उपायुक्त सुहैल शर्मा यांच्याकडून कारवाईचा ड्राफ्ट तयार करण्यात येत आहे. साेशल मिडियावरील अल्पवयीन मुलांची भाईगिरी ही याद्वारे माेडीत काढण्यात येणार आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.