आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराआरोग्य सेवा ही अतिशय मोलाची सेवा आहे. त्यातही ससून सारख्या रुग्णालयात आरोग्य सेवा करणे म्हणजे खरी देशसेवा असून ती अंतकरणापासून घडली पाहिजे. आणि ते आदर्श कार्य ससून रुग्णालयाचे शल्यचिकित्सक डॉ. पी. टी. गायकवाड यांनी केले. त्याचेच प्रतिबिंब त्यांच्या या साहित्यात उमटलेले दिसत आहे, असे मत ज्येष्ठ साहित्यिक रंगनाथ पठारे यांनी व्यक्त केले आहे.
डॉ. पी. टी.गायकवाड लिखित "हीपोक्रेट्सच्या नावानं चांगभलं" या पुस्तकाचे बी.जे.वैद्यकीय महाविद्यालच्या म. गांधी सभागृहात प्रकाशन समारंभ प्रसंगी ते बोलत होते . पठारे म्हणाले की, भाषेच्या शुचित्वाच्या प्रश्नाचीही आज चर्चा झाली. खरे तर मराठीतील अहिराणीपासून झाडीबोलीपर्यंत कोणतीही बोली ही प्रमाणभाषा होऊ शकते, पण सत्ता कोणाची यावर कोणाची भाषा शुध्द व प्रमाण हे ठरत असते. विविधतेत एकता हे तत्व भाषेलाही लागू आहे. या कादंबरीत शीर्षकातील चांगभलं पासून कादंबरीभर मराठी भाषेची रंगदार, सौष्ठवपूर्ण वेगवेळी रूपे दिसतात.सुंदर मराठी भाषेचे आल्हाददायक रूप आपल्याला दिसते.
पठारे म्हणाले, कोविड महामारीत अनेक जीव गमावले, खरे तर हे या व्यवस्थेचे अपयश आहे. पण त्याची नीट चिकित्सा अजुन झालेली नाही. हिप्पोक्रेटस् हा पायथोगोरसचा शिष्य होता आणि दैवी अवकृपेने माणसाला आजार होत नाहीत तर निसर्गचक्राचा भाग म्हणून ते होतात असे त्याने स्पष्टपणे प्रतिपादन केले. हिप्पोक्रेटस् ने लिहलेली शपथ आजही महत्वाची आहे. या शपथेचे आपण काय करत आहोत हा प्रश्न या कांदबरीत मध्यभागी आहे. एका परिपूर्ण भौगोलिक तथ्यावर कल्पनेची इमारत व्यवस्थित उभी करण्यात डॉ. पी.टी. गायकवाड यशस्वी झालेले आहेत.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.