आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुण्यातील धक्कादायक घटना:चोरटे बळजबरीने घरात शिरले, घरातील महिलेच्या तोंडावर टॉवेल गुंडाळला, नंतर मारहाण करत दागिने लुटले

पुणे | प्रतिनिधी2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

थेट घरात शिरून महिलेस मारहाण करुन चोरट्यांनी पावणेदोन लाख रुपयांचे सोन्याचे दागिने पळवून नेल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. याप्रकरणी कोंढवा पोलिस ठाण्यात दोन अनोळखी आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांकडे बिलकीस मोहम्मद ईसाक शेख (वय ६०) यांनी तक्रार दाखल केली आहे.

पोलिसांनी सांगितले की, 2 फेब्रुवारी रोजी सकाळी 10 वाजता कोंढवा परिसरात मिठानगरमधील चेतना गार्डन सोसायटीत ही घटना घडली. तक्रारदार ज्येष्ठ महिला तिच्या घरी असताना दोन अनोळखी व्यक्ती विनापरवानगी घरात शिरले. त्यांनी महिलेच्या तोंडावर घरातील टॉवेल लपेटून तिला मारहाण केली. आरोपी महिलेच्या सोन्याच्या बांगडया बळजबरीने ओढू लागले, तेव्हा महिलेने चोरटयांना विरोध केला. यानंतर आरोपीने महिलेच्या सहा महिन्याच्या नातवास स्वत:कडे घेत त्याला मारहाण करण्याची धमकी दिली.

त्यानंतर ज्येष्ठ महिला व तिच्या सुनेच्या गळयातील सोन्याचे गंठण, असे एक लाख ८० हजार रुपयांचे ४५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने आरोपींनी पळवून नेले. या घटनेची माहिती मिळताच, कोंढवा पोलिस घटनास्थळी दाखल होऊन त्यांनी परिस्थितीची पाहणी करत आरोपींचा शोध सुरु केला आहे. याबाबत पुढील तपास कोंढवा पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक एस. भाबड करत आहेत.

दुसऱ्या घटनेत तीन लाखांचे दागिने लंपास

दुसऱ्या एका घटनेत सिंहगड रोड परिसरात हिंगणे खुर्द येथे आनंदविहार येथे राहणाऱ्या विद्या गणपत केमसे (वय ६०) या दोन फेब्रुवारी रोजी दुपारी घराचे मुख्य दरवाज्याचे कुलुप लावून घराबाहेर गेल्या होत्या. त्यावेळी चोरटयांनी घराच्या मुख्य दरवाजाचा कोयंडा तोडून घरात प्रवेश केला व कपाटात ठेवलेले १०७ ग्रॅम वजनाचे तीन लाख १६ हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने पळवून नेले. याबाबत पुढील तपास सिंहगड रोड पोलिस करत आहेत.

बातम्या आणखी आहेत...