आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशासनाच्या कोविड मार्गदर्शक सूचनांनुसार विविध क्रीडा स्पर्धांना २५ टक्के प्रेक्षक उपस्थितीत परवानगी देण्यात यावी आणि कोविड संसर्गाचे प्रमाण कमी झाल्याने सोमवारपासून पहिली ते आठवीचे वर्ग पूर्णवेळ सुरू करावे, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले.
विभागीय आयुक्त कार्यालयात झालेल्या पुणे जिल्हा कोविड व्यवस्थापन आढावा बैठकीत ते बोलत होते. या वेळी विधान परिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे, राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, महापौर उषा ढोरे, जि. प. अध्यक्षा निर्मला पानसरे, विभागीय आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख उपस्थित होते. पवार म्हणाले, नवीन रुग्णसंख्या कमी झाली असली तरी आणखी काही काळ दक्षता घेण्याची आवश्यकता आहे. पुणे ग्रामीण आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिका क्षेत्रात लसीची दुसरी मात्रा घेणाऱ्यांचे प्रमाण वाढवावे.
खासगी रुग्णालयात उपचारासाठी जाणाऱ्या गंभीर रुग्णांची कोविड चाचणी पॉझिटिव्ह आल्यास त्यांना तातडीने उपचार मिळण्यासाठी रुग्णालयांना व्यवस्था करण्याचे निर्देश द्यावेत. जिल्ह्यात १५ ते १८ वयोगटातील लसीकरणासाठी कोव्हॅक्सिन लसमात्रांचा साठा उपलब्ध नसल्याने लसीकरणाची गती मंदावली आहे. कोव्हॅक्सिन लसीचा पुरवठा होण्याबाबत केंद्र शासनाकडे पाठपुरावा करण्यात येईल, त्यामुळे लसीकरणाचे प्रमाण वाढण्यास मदत होईल, असेही त्यांनी सांगितले.
येरवडा दुर्घटनाप्रकरणी जिल्हाधिकारी या समितीचे अध्यक्ष असणार आहेत. या समितीला अहवाल तातडीने द्यायला सांगितला आहे. अहवाल आल्यावर कारवाई करण्यात येणार असल्याचे पवार यांनी या वेळी सांगितले. दरम्यान, विभागीय आयुक्त राव यांनी सादरीकरणाद्वारे जिल्ह्यातील कोविड परिस्थितीची माहिती दिली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.