आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज्यभरात कडाक्याच्या थंडीमुळे नागरिकांमध्ये हुडहुडी:अनेक ठिकाणी पारा घसरला; पुण्यात या हंगामातील नीचांकी तापमानाची नोंद

पुणे10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्यात गेल्या दोन दिवसांपासून जाणवणारा गारठा आता हुडहुडीत बदलला आहे. अनेक ठिकाणी किमान तापमान घसरले आहे. रात्रीच्या गारठ्यासोबत दिवसभर गार वारेही वाहात आहेत. पुण्यात यंदाच्या हंगामातील नीचांकी तापमानाची नोंद रविवारी झाली. 9.7 इतके किमान तापमान नोंदवले गेल्याची माहिती भारतीय हवामानशास्त्र विभागाने दिली आहे. येत्या दोन दिवसांपर्यंत हा गारठा टिकून राहण्याची शक्यताही आयएमडीने व्यक्त केली आहे.

ऑक्टोबर महिनाअखरेरपर्यंत यंदा परतीचा पाऊस रेंगाळला. त्यामुळे थंडीचे आगमनही लांबले. गेल्या आठवडाभरापासून मात्र राज्याच्या अनेक भागांत थंडी जाणवू लागली होती. त्यात हळूहळू वाढ होत, शनिवारी रात्री आणि रविवारी सकाळी थंडी बोचरी बनली आणि राज्यात अनेक ठिकाणी किमान तापमानाचा पारा 10 अंशांखाली घसरला. विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र येथेही थंडीचा कडाका वाढल्याचे दिसून आले.

उत्तरेकडील राज्यात झालेली बर्फवृष्टी, तेथून वाहणारे थंड वारे आणि राज्यभरातील कोरडे हवामान , निरभ्र आकाश यामुळे थंडीचे प्रमाण वाढले आहे. ही परिस्थिती पुढील 48 तास कायम राहण्याची शक्यता असल्याने राज्यात थंडीचा प्रभाव टिकून राहील, असे आयएमडीने म्हटले आहे. हे हवामान रब्बी पिकांसाठी पोषक ठरणारे आहे.

पुण्यामध्ये रविवारी सकाळी या हंगामातील नीचांकी तापमान 9.7 अंश इतके नोंदवले गेले. पारा यंदा प्रथमच दहा अंशांखाली आला. मात्र, पुणे जिल्हा, पुणे उपनगरे आणि शहरातही किमान तापमानाचा पारा निरनिराळ्या नोंदींचा होता. सर्वात गर्दीचे, प्रदूषित भाग तुलनेने अधिक तापमानाचे दिसून आले. हवेली भागात 8.8 अंश, पाषाण परिसरात 9 तर एनडीए भागात 9.2 अंश इतक्या किमान तापमानाची नोंद रविवारी झाली. त्याउलट हडपसर परिसरात 12.3 तर वडगाव शेरी येथे 17.5 अंश तापमान नोंदवले गेल्याची माहिती मिळाली. पुणे जिल्ह्यात बारामती 10.8, आंबेगाव 11.1, दौंड 11.3, राजगुरूनगर 11.8, इंदापूर 11.5..असे किमान तापमान आढळून आले. राज्यात जळगाव 8.5, औरंगाबाद 9.2, नाशिक 9.8, परभणी 11.5, सोलापूर 14.6, नांदेड 12.6, कोल्हापूर 15.2, सातारा 12.6, जालना 12 तर रत्नागिरी 19.7 असे किमान तापमान नोंदवले गेले.

बातम्या आणखी आहेत...