आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बिबट्याचे 14 दिवसांचे पिल्लू आईच्या कुशीत सुखरूप:पुणे जिल्ह्यातील ओतूर वनविभागाचे रेस्क्यू ऑपरेशन फत्ते

पुणे13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

वनविभागाचे कर्मचारी पथक, रेस्क्यू ऑपरेशन टीम आणि स्वयंसेवी संस्थेच्या सहकार्याने अवघ्या 14 दिवसांचे बिबट्याचे पिल्लू सुखरूपरीत्या आईजवळ पोचवण्यात वनविभागाला यश मिळाले. पिल्लाला आईजवळ पोचवण्याचा पहिला प्रयत्न अयशस्वी होऊनही, पुन्हा जिद्दीने प्रयत्न केल्याने पिल्लू आईजवळ पोचवण्यात वनविभाग यशस्वी ठरला.

पथक घटनास्थळी पोहोचले

पुणे जिल्ह्यातील ओतूर तालुक्यातील अणे या गावात ऊसतोडणीचे काम सुरू असताना, गावकऱ्यांना बिबट्याचे अगदी छोटे पिल्लू आढळले. या परिसरात ही घटना वरचेवर घडत असल्याने गावकऱ्यांनी त्वरित वनविभागाला कळवले. त्यानुसार वनविभागाची रेस्क्यू टीम, वनकर्मचारी पथक तसेच वाईल्डलाईफ एसओएसचे पथक घटनास्थळी पोहोचले. पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. निखिल बनगर यांनी बिबट्याच्या पिलाची वैद्यकीय तपासणी केली. हे पिल्लू मादी असून, पिल्लाचे वय अवघे 14 दिवसांचे असावे, असे डॉ. बनगर यांनी सांगितले.

पिल्लाची प्रकृती उत्तम

रेस्क्यू टीम सर्व साधनसामग्रीसह आणि वैद्यकीय तपासणी संचासह घटनास्थळावर पोचली. सर्वांच्या एकत्रित विचारांतून पिल्लाला त्याच रात्री आईजवळ पोचवण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र, पहिल्या रात्री पिल्लाची आई तेथे फिरकली नाही. त्यामुळे पहिला प्रयत्न अयशस्वी ठरला. पण नाउमेद न होता, दुसऱ्या रात्री पुन्हा प्रयत्न करण्याचा निर्णय घेण्यात आला, कारण पिल्लाची प्रकृती उत्तम होती. दुसऱ्या रात्री पिल्लाच्या मूत्राचे काही थेंब आई बिबट्याच्या मदतीसाठी आसपास टाकण्यात आले. घ्राणेंद्रिय अतितीक्ष्ण असलेल्या आई बिबट्याने दुसऱ्या रात्री पिल्लाचा अचूक माग घेतला आणि दुरावलेल्या बछड्याला जबड्यात अलगद पकडून तिने सुरक्षित जागी हलवले. अशा रीतीने दुसऱ्या प्रयत्नांत पिल्लू पुन्हा आईजवळ पोचले.

डॉ. बनगर म्हणाले,‘पिल्लू मादी होते आणि 14 दिवस वयाचे होते. सापडले तेव्हा पिलाची तब्येत उत्तम होती. त्यामुळे माणिकडोह केंद्रात तपासणी करण्याची गरज नव्हती. वाईल्डलाईफ एसओएस संस्थेचे सहसंस्थापक कार्तिक सत्यनारायण म्हणाले, ‘पिल्लाची तब्येत चांगली असल्याचे समजताच त्याला आईपाशी सोडण्याचा प्रयत्न लगेच करण्याचे ठरले. ट्रॅप कॅमेऱ्यांनी हा पुनर्भेटीचा क्षण नेमका टिपला आहे,’. ओतूर वनविभागाचे वैभव काकडे म्हणाले,‘या परिसरातील नागरिकांमध्ये वन्य प्राणी दिसला की काय करायचे, याची जनजागृती आहे. त्यामुळे पिलाची सुखरूप सुटका झाली. पिल्लू सुखरूप आईजवळ पोचल्याचा आनंद वाटतो.'

बातम्या आणखी आहेत...