आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराविरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या दूरदृष्टीने पुणे जिल्हा शिक्षण मंडळ यशाच्या मार्गावर वाटचाल करत आहे. त्यामुळे त्यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित पुणे ते बारामती राष्ट्रीय सायकल स्पर्धेमध्ये ग्रामीण भागातील खेळाडूंना आपले कौशल्य दाखविण्याची संधी मिळाली आहे. यातून राज्याचे व देशाचे नाव उज्ज्वल करणारे गुणवत्तापूर्ण खेळाडू घडतील, असे प्रतिपादन माजी गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी शनिवारी केले.
मंडळाचे कार्य प्रेरणादायी
महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री, विरोधी पक्षनेते व पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे अध्यक्ष अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त शनिवार वाडा येथे पुणे जिल्हा शिक्षण मंडळातर्फे आयोजित राष्ट्रीय व राज्यस्तरीय सायकल स्पर्धेच्या शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते. पुणे जिल्ह्याच्या तळागाळापर्यंत शिक्षणाची गंगा पोहोचवण्यासाठी विद्यार्थी केंद्रबिंदू मानून जिल्हा शिक्षण मंडळाने केलेले कार्य प्रेरणादायी असल्याचेही ते म्हणाले.
याप्रसंगी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. संजीव सोनवणे, आमदार रोहित पवार, शहराध्यक्ष प्रशांत जगताप, महाराष्ट्र ॲालिम्पिक असोसिएशनचे सचिव बाळासाहेब लांडगे, अभिनेते महेश कुलकर्णी, प्राजक्ता गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती होती.
आंतरराष्ट्रीय पातळीवर ओळख
स्पर्धेचे प्रास्ताविक करतांना जिल्हा शिक्षण मंडळाचे सचिव अॅड. संदीप कदम यांनी अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित राष्ट्रीय सायकल स्पर्धेची संकल्पना स्पष्ट केली. त्याचबरोबर या सायकल स्पर्धेची आंतरराष्ट्रीय पातळीवर ओळख निर्माण झाली आहे असे नमूद करत पुणे जिल्हा शिक्षण मंडळातर्फे विद्यार्थ्यांच्या कला गुणांना वाव देण्यासाठी व शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी आयोजित विविध उपक्रमांची माहिती दिली.
कौशल्य दाखवण्याची संधी
आमदार रोहित पवार यांनी कोविड महामारीच्या काळातील दोन वर्षांचा अपवाद वगळता गेली 7 वर्षे सातत्याने या स्पर्धेचे यशस्वीपणे आयोजन केल्याबद्दल मंडळाचे कौतुक केले. तसेच युवा वर्गाला आपले नैपुण्य दाखवण्यासाठी हक्काचे व्यासपीठ मिळणे आवश्यक आहे असे सांगत अशा प्रकारच्या स्पर्धांमधून विद्यार्थ्यांना आपले कौशल्य दाखवायची संधी मिळते, असे स्पष्ट केले. अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड यांनी या स्पर्धेमध्ये सहभागी विद्यार्थ्यांचे कौतुक करत स्पर्धेस शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमृता खराडे, नितीन लगड तर आभार प्रदर्शन अॅड. मोहन देशमुख यांनी केले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.