आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासंशोधकांचे प्रशिक्षण, जगभरातल्या आरोग्य संस्थांशी समन्वय, आरोग्य विषयक संस्थांचे बळकटीकरण, आयुर्वेदातील संशोधन, योगशास्त्र अभ्यासक्रम अशा अनेक महत्वाच्या बाबी मागील तीन वर्षात विद्यापीठाच्या आरोग्यशास्त्र विभागात विविध सामंजस्य कराराच्या माध्यमातून सुरू आहेत. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने मागील तीन वर्षात दीडशेहून अधिक सामंजस्य करार केले. या माध्यमातून विद्यापीठ अनेक संस्थांशी जोडले गेले असून यातून समाजाभिमुख कामे आणि संशोधन करण्यात येत आहे.
सिरो-सर्वेक्षण
आरोग्यशास्त्र विभागाने आयसर, पुणे व पुणे महानगरपालिका यांच्या सहयोगाने पुण्यातील विविध प्रभागातील महासाथीच्या स्थितीचे निरीक्षण केले. हा प्रकल्प महासाथीच्या सुरुवातीच्या काळात स्वास्थ्य सेवांचे नियोजन करण्याकरीता आवश्यक होता. विभागातील प्राध्यापक - डॉ. आरती नगरकर, डॉ. अभय कुदळे व यांनी विभागातील संशोधक विद्यार्थी यांना प्रशिक्षण देऊन हा प्रकल्प पूर्णत्वास नेला.
अश्वगंधा संशोधन
विद्यापीठातील आरोग्यशास्त्र विभाग आणि आयुष मंत्रालय यांच्यात झालेल्या सामंजस्य करारानुसार सध्या विद्यापीठात दोन एकत्रित संशोधन प्रकल्प सुरू आहेत. अश्वगंधा या आयुर्वेदिक औषधीचा कोविड काळात प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी उपयोग होतो की नाही यावर भारतभर संशोधन होत असून त्याचे एक संशोधन केंद्र विद्यापीठात स्थापन करण्यात आले आहे, अशी माहिती विभागातील प्रा.डॉ.गिरीश टिल्लू यांनी दिली.
कर्करोग आणि आमवात संशोधन
आयुष मंत्रालयासोबत जो करार झाला आहे त्या माध्यमातून कर्करोग आणि आमवात या आजारांवर आयुर्वेदिक औषधे विषयावर संशोधन सुरू आहे. त्यासोबतच नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ नॅचरोपँथीसोबत झालेल्या कराराच्या माध्यमातून निसर्गोपचार आणि जीवनपद्धती केंद्र विद्यापीठात उभारण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत असे डॉ. शशिकांत दूधगावकर यांनी सांगितले.
'ऑटीजम ' विषयक अभ्यासक्रम
विभागाने लता मंगेशकर हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर सोबत जो करार केला त्या माध्यमातून ऑटीजम या विषयात अभ्यासक्रम ठरविण्यास मदत करणे, त्याला प्रमाणपत्राची जोड देणे आदी बाबी या विद्यापीठाने केल्या आहेत. त्यासोबतच कबीर बाग या संस्थेला योग अभ्यासक्रम तयार करून देण्याचे कामही विभागाकडून करण्यात आले असल्याची माहिती आरोग्यशात्र विभागाच्या प्रमुख डॉ. आरती नगरकर यांनी दिली.
30 विद्यार्थ्यांना फेलोशिप
आयुष मंत्रालयाकडून मिळणाऱ्या अर्थसहाय्यातून विभागातून आतापर्यंत 30 विद्यार्थ्यांना फेलोशीप देण्यात आली आहे. तर 20 विद्यार्थ्यांना मार्गदर्शन देण्यात आले. याशिवाय विभागात सुरू असणाऱ्या विविध प्रकल्पांच्या माध्यमातून 25 विद्यार्थी व तीन प्राध्यापक विविध संशोधन प्रकल्पांवर काम करत आहेत असेही डॉ.गिरीश टिल्लू यांनी सांगितले. आरोग्यशास्त्र विभागाच्या माध्यमातून दोन पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम, दोन प्रमाणपत्र अभ्यासक्रम आणि संशोधन अभ्यासक्रम सुरू आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.