आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराभारतीय लष्कर केवळ सीमेवर लढत नाही, तर देशाच्या अंतर्गत भागात ही मोठ्या प्रमाणात काम करते. देशाची सुरक्षा, पूर, दुष्काळ अशा परिस्थितीत लष्कर सदैव कार्यरत असते. लष्करासाठी तरतूद केल्या जाणाऱ्या एकूण निधीच्या 37 टक्के निधी हा देशातील अंतर्गत कामासाठी वापरण्यात येतो असे मत भारतीय लष्कराचे दक्षिण मुख्यालयाचे प्रमुख लेफ्टनंट जनरल मंजीत कुमार यांनी शुक्रवारी व्यक्त केले.
पुणे छावणी परिषदेच्या अंतर्गत आर्मी पब्लिक स्कूल घोरपडी गाव याठिकाणी आयोजित विद्यांजली कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी शाळेच्या प्राचार्य अनिता शर्मा, घोरपडे विलेज हायस्कूलच्या प्राचार्य गायत्री डोके व्यासपीठावर उपस्थित होत्या. देशाच्या अमृत महोत्सवी वर्षा निमित्त लष्कराच्या दक्षिण मुख्यालय अंतर्गत 75 शाळा विद्यांजली कार्यक्रम राबविण्यात येणार आहे.
मांजित कुमार म्हणाले, देशात शांतता असणे महत्त्वपूर्ण बाब आहे. शत्रु आपल्यावर हल्ला करत नाही या विश्वासामुळे आपण प्रगती करू शकतो. जागतिक महासत्ता बनण्यासाठी देशात आणि सीमेवर शांतता प्रस्थापित असणे महत्त्वाचे आहे. अमृत महोत्सवी वर्षात देशाचे पंतप्रधान यांनी आपल्याला पुढील काळात वेगाने प्रगती करावी लागेल असे संकेत दिले आहे. 2047 मध्ये स्वातंत्र्यास शंभर वर्ष पूर्ण होत असून यादरम्यानचा काळ आपल्या प्रगतीसाठी अमृत काळ आहे.आजची मुले देशाचे उद्याचे भविष्य आहे, त्यामुळे मुलांनी देशाचे चांगले नागरिक बनण्यासाठी आणि देशाच्या विकासात सहभागी होण्यासाठी आगामी काळात वाटचाल करावी.
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 अंतर्गत शिक्षण प्रणालीत आधुनिक कौशल्यांचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे पाठ्यपुस्तक शिक्षणासोबतच इतर शिक्षण विद्यार्थ्यांना उपलब्ध होईल. शाळेत चांगले शिक्षण, संस्कार मिळतात. त्यामुळे शाळेतील शिक्षक पालकांप्रमाणे वंदनीय असून त्यांचा आदर विद्यार्थ्यांनी करावा. 'विद्यांजली कार्यक्रम ' विद्यार्थ्यांच्या प्रगतीच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असून देशाच्या भविष्याच्या दृष्टीने चांगल्या प्रकारे विद्यार्थी विकसित झाले पाहिजे. विद्यार्थ्यांनी प्रामाणिकपणे काम करण्याचा संकल्प जीवनात करावा. यंदा प्रथमच भारतीय लष्कर दिनाचे १५ जानेवारी रोजी संचलन दिल्ली सोडून दक्षिण मुख्यालय अंतर्गत बंगळूर याठिकाणी होणार आहे ही बाब आपल्या दृष्टीने अभिमानास्पद आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.