आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअवघ्या महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्व असलेल्या पु. ल. देशपांडे यांचा 12 जून रोजी स्मृतिदिन असून, यानिमित्त कोहिनूर प्रस्तुत आणि आशय फिल्म व सांस्कृतिक क्लबतर्फे 11 ते 12 जून रोजी 'कोहिनूर पु. ल. स्मृती महोत्सव' आयोजित करण्यात आला आहे. सर्वांसाठी मोफत असलेल्या या महोत्सवात रसिकांना विविध कार्यक्रमांची पर्वणी मिळणार आहे, अशी माहिती महोत्सवाचे संयोजक वीरेंद्र चित्राव आणि सतीश जकातदार यांनी मंगळवारी दिली.
आठवणींना उजाळा
सदरील कार्यक्रम संध्याकाळी 6 वाजता स.प. महाविद्यालयाच्या लेडी रमाबाई सभागृहात पार पडणार आहे. 11 जून रोजी ज्येष्ठ साहित्यिका मंगला गोडबोले यांच्या हस्ते महोत्सवाचे उद्घाटन होणार आहे. यावेळी 'पु. ल. संचित' या विषयावर त्या विचार मांडणार आहेत. या कार्यक्रमात, चित्रपटाचे जतन आणि संवर्धन क्षेत्रात मोलाचे योगदान दिल्याबद्दल राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाचे (अर्काइव्ह) माजी संचालक प्रकाश मगदूम यांचा विशेष सन्मान करण्यात येणार आहे. पु. ल. आणि सुनिताबाई यांच्यावर 'अनुभव' या मासिकात आलेल्या 'तप:स्वाध्याय' या ललित निबंधावर आधारित अभिवाचनाचा 'प्रिय भाई..एक कविता हवी होती' हा रंगमंचीय अविष्कार यावेळी सादर होणार आहे. या कार्यक्रमाचे दिग्दर्शन अमित वझे यांनी केले असून लेखन आणि रंगावृत्ती डॉ. समीर वसंत कुलकर्णी यांची, तर चित्रे मिलिंद मुळीक यांची आहे. हा कार्यक्रम जयदीप वैद्य, अपर्णा केळकर, निनाद सोलापूरकर, अमित वझे आणि मुक्ता बर्वे सादर करणार आहेत.
महोत्सव विनामूल्य
महोत्सवात रविवार 12 जून रोजी पु. लं. यांचा चित्रपट, नाटक, संगीत, साहित्य, कला क्षेत्रातील द्रष्टेपणावर आधारित 'द्रष्टे पु. ल.' हा परिसंवाद होणार आहे. यामध्ये डॉ. मंदार परांजपे, प्रकाश मगदूम, प्रवीण तरडे, डॉ. आशुतोष जावडेकर आणि डॉ. रामचंद्र देखणे सहभागी होणार असून प्रा. मिलिंद जोशी सूत्रसंचालन करणार आहेत. यानंतर पुलंच्या अमृत महोत्सवाचे निमित्त साधून तयार केलेला सुधीर मोघे आणि मुक्ता राजाध्यक्ष दिग्दर्शित 'या सम हा' हा दुर्मिळ लघुपट दाखवण्यात येणार आहे. सर्वांसाठी हा महोत्सव विनामूल्य आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.