आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अहो आश्चर्यम्:विद्येचे माहेरघर पुण्यात 65 शिक्षक 'ढ'; आदर्श शाळेतील प्रकाराने 'झेडपी' हैराण, लाखभर विद्यार्थ्यांचा प्रश्न

पुणेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

विद्यापीठाचे माहेघर अशी पुण्याची ओळख. पण, पुण्यात शिक्षकच जर 'ढ' असतील तर? जरा विचित्र वाटतंय ना! पण हे खरं आहे. विद्येच्या माहेरघरात विद्यार्थ्यांना घडविणारे शिक्षकच 'ढ' निघाले आहे. विशेष म्हणजे हे शिक्षक ज्या शाळांत आहेत, त्या शाळा जिल्ह्यातील आदर्श शाळा आहेत. जवळपास 65 शिक्षक 'ढ' निघाले असून पुणे जिल्हा परिषद आता या शिक्षकांची 'शाळा' भरवणार आहे. जर, या परीक्षेत ते नापास झाले तर त्यांच्यावर कारवाई होण्याची शक्यता आहे.

पुणे तिथे काय उणे

शाळेत असतांना शिक्षकांनी तुम्हाला पाढे पाठ करायला सांगितले असतील. या सोबतच गृहपाठही करायला लावले असतील. यावेळी तुम्हाला जर पाढे नीट म्हणता आले नसतील, तर शिक्षकांनी तुम्हांला नक्कीच 'ढ'संबोधले असणार. पण याच पुण्यामध्ये शिक्षकच 'ढ' निघाले आहेत. मात्र, पुणे जिल्हा परिषदेचे हे शिक्षकच शिकवण्यात कमी पडले असून आता त्यांना पुन्हा शिकवण्याची वेळ जिल्हा परिषदेवर आली आहे. काही दिवसांपूर्वी जिल्ह्यात पहिल्या टप्प्यातील 410 आदर्श शाळांमध्ये पालकमंत्री शिक्षण सुधार कार्यक्रम राबवण्यात आला होता. या कार्यक्रमांतर्गत या आदर्श शाळांमधील 3 हजार 430 शिक्षकांचे अध्यापन कौशल्ये तपासण्यात आली.

कामगिरी अतिशय सुमार

प्रत्येक शिक्षकाला शिकवण्यासाठी जवळपास 40 मिनिटे वेळ देण्यात आला. यात त्यांना विद्यार्थ्यांना शिकवण्यास सांगण्यात आले. त्याचे मूल्यमापन करण्यासाठी खासगी, सरकारी तज्ज्ञ, तसेच एनजीओचे प्रतिनिधी या वर्गात उपस्थित होते. मात्र, या परीक्षेत 65 शिक्षक नापास झाले. त्यांची कामगिरी अतिशय सुमार असल्याचे सिद्ध झाले. मात्र, या परीक्षेत 2979 शिक्षक हे विशेष प्रविण्यासह उत्तीर्ण झाले.तर 251 शिक्षक हे पहिल्या वर्गात तर 151 शिक्षक हे दुसऱ्या वर्गात उत्तीर्ण झाले.

पुन्हा देणार प्रशिक्षण

या शिक्षकांना पुन्हा प्रशिक्षित करण्यासाठी आता जिल्हा शिक्षण आणि प्रशिक्षण संस्थेमार्फत 6 ते 10 जून दरम्यान प्रशिक्षण दिले जाणार आहे, असे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी सांगितले. या आदर्श शाळांवर जवळपास 96 कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील या आदर्श शाळांमध्ये जवळपास 1 लाख 15 हजार विद्यार्थी शिक्षण घेतात. त्याच्या भवितव्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. यामुळे या शिक्षकांना सुधारण्याची ही शेवटची संधी आहे. त्यांना 6 ते 10 तारखेदरम्यान प्रशिक्षण दिले जाणार आहे. यात ते नापास झाल्यास त्याच्यावर नियमानुसार कारवाई केली जाणार आहे, असे आयुष प्रसाद यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...