आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बोर्ड काढला:पुण्याचा पाषाण तलाव ‘लव्ह बर्ड’साठी खुला! ; ‘राईट टू लव्ह’ संघटनेच्या प्रयत्नांना यश

पुणे3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे महानगरपालिकेने अविवाहित जोडप्यांना ‘पाषाण तलाव’ परिसरात येण्यास बंदी घालणारा फतवा काढून ‘Couple not allowed’ असा बोर्ड लावला होता. या निर्णयाला शुक्रवारी ‘राईट टू लव्ह’च्या वतीने कडाडून विरोध करण्यात आला होता. पालिकेने घेतलेला हा निर्णय त्वरित मागे घेण्यात यावा, अशा मागणीचे निवेदन पालिका आयुक्तांना आणि उद्यान विभाग अधीक्षक अशोक घोरपडे यांना दिले होते. त्यानंतर शनिवारी महापालिकेने हा बोर्ड काढून टाकला आहे.

‘राईट टू लव्ह’चे ॲड. विकास शिंदे म्हणाले, अविवाहित जोडप्यांमुळे पक्षीनिरीक्षणात अडथळा येत असल्याचे कारण देत पुणे महापालिकेने हा फतवा काढला होता. सदर आदेश वा फतवा पूर्णपणे बेकायदेशीर आणि घटनेतील मूलभूत अधिकारांचे उल्लंघन करणारा आहे. त्यामुळे सदर आदेश तात्काळ मागे घेण्यात यावा, अशी मागणी ‘राईट टू लव्ह’ने केली होती. या मागणीला यश आले असून, महानगरपालिकेने पाषाण तलाव परिसरात लावलेला ‘Couple not allowed ‘ चा फलक काढून टाकला आहे. असे वाद पुन्हा होऊ नयेत व प्रेम करणाऱ्या व्यक्तींवर अन्याय न होता त्यांचा सन्मान व्हावा यासाठी पुणे महानगरपालिकेने शहरातील किमान १० गार्डन्स ‘कपल गार्डन्स’ म्हणून घोषित करावित यासाठी आम्ही येणाऱ्या काळात पाठपुरावा करणार आहोत.

प्रेम करणाऱ्यांना सुरक्षित जागा हवी
सद्यस्थितीमध्ये प्रेम करणाऱ्या जोडप्यांना योग्य व सुरक्षित जागा नसल्यामुळे नद्यांलगतचे रस्ते, झेड ब्रीज तसेच इतर पुलांचे कठडे, सिम्बॉयसिस टेकडी, पर्वती टेकडी इ. ठिकाणी एकमेकांना भेटावे लागते व बरेचदा संस्कृती रक्षकांकडून त्यांना मारहाण, शिवीगाळ अशा प्रकारांना सामोरे जावे लागतेय. संध्याकाळच्या वेळी मुलींचे विनयभंग झाल्याचे प्रकार वारंवार घडत आहेत. पुण्यासारख्या पुढारलेल्या शहरामध्ये प्रेम करणारांसाठी सुरक्षित ठिकाण नसणे आणि त्यात संस्कृती रक्षकांबरोबरच पोलिसांनीही प्रेम करणाऱ्या जोडप्यांना हुसकावुन लावणे, त्यांच्यावर कारवाई करणे हा खरंतर अन्याय आहे. त्यामुळे मनपाने कपल गार्डन सुरू करावेत.

पुणे तिथे काय उणे
शिंदे म्हणाले, पुणे शहरात प्रेम करणाऱ्या जोडप्यांची संख्या खूप मोठी आहे. ‘पुणे तिथे काय उणे’ अशी म्हण प्रसिद्ध आहे. परंतु दुर्दैवाने प्रेम करणाऱ्यांसाठी सुरक्षित ठिकाणे नाहीत. प्रेम करणे हा अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा भाग आहे. धकाधकीच्या जीवनातील एकटेपणावर प्रेमच औषध असल्याचे शिंदे म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...