आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकाँग्रेसचे नेते राहुल गांधी यांचे खासदारपद रद्द करणे म्हणजे लोकशाहीचा गळा घोटून खून केल्यासारखे आहे अशी टीका पिंपरी चिंचवड शहर काँग्रेसचे अध्यक्ष डॉ. कैलास कदम यांनी रविवारी येथे केली.
कदम यांच्या नेतृत्वाखाली थेरगाव डांगे चौक येथे खासदार राहुल गांधी यांच्या समर्थनार्थ आंदोलन करण्यात आले. यावेळी केंद्र सरकारच्या विरोधी घोषणा देत काँग्रेस कार्यकर्त्यांनी निषेध केला.
यावेळी कदम म्हणाले, 'राहुल गांधी यांनी संसदेमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अदानी यांच्या कंपनीत 20 हजार कोटी रुपये कुठून आले हा प्रश्न विचारला असता त्याचे उत्तर देण्याऐवजी सत्ताधारी पक्षाच्या खासदारांनी संसदेत गोंधळ घालून कामकाज तहकूब केले. यानंतर अवघ्या काही तासात सुरत येथील कनिष्ठ न्यायालयाने खासदार राहुल गांधी यांचे रद्द केले. याचा आधार घेत केंद्र सरकारने एकतर्फी निर्णय घेत राहुल गांधी यांचे खासदार पद रद्द केले.
याविषयी तीव्र प्रतिक्रिया देशभर उमटत आहेत. राहुल गांधी यांच्या समर्थनार्थ शहर काँग्रेसच्या वतीने नाशिक फाटा येथे सह्यांची मोहीम सुरू आहे. चिंचवड थरमॅक्स चौक येथे सत्याग्रह आंदोलन करण्यात आले आणि आज रविवारी डांगे चौक थेरगाव येथे जेल भरो आंदोलन करण्यात आले.
या सर्व आंदोलनास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून पिंपरी चिंचवड शहरातील नागरिकांच्या वतीने एक लाख पोस्ट कार्ड केंद्र सरकारचा निषेध करीत पंतप्रधान नरेंद्र मोदींना पाठवण्यात येणार आहेत. यामध्ये सद्य परिस्थितीत नागरिकांना भेडसवणारे प्रश्न महागाई, बेरोजगारी, इंधन दरवाढ याचा देखील उल्लेख करण्यात येणार आहे असेही कदम यांनी सांगितले.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.