आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

रायगड:दुर्गराज रायगडावरील हत्ती तलाव शंभर वर्षांनंतर प्रथमच पूर्ण भरला, किल्ले रायगडावर 84 पाणीसाठे

पुणे / जयश्री बोकील10 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • शंभर वर्षांनी काठोकाठ भरला किल्ले रायगडावरील हत्ती तलाव

छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची राजधानी म्हणून निवडलेला आणि सजवलेल्या दुर्गराज रायगडावरील ऐतिहासिक हत्ती तलाव यंदाच्या पावसाळ्यात सुमारे शंभर वर्षांनंतर प्रथमच पूर्ण क्षमतेने भरला आहे. रायगड विकास प्राधिकरणामार्फत सुरू असलेल्या विविध कामांमध्ये गडावरील तलाव व टाक्यांतील गाळ काढणे, गळती रोखणे आणि स्वच्छतेची कामे सुरू आहेत, त्याचा परिपाक म्हणून हत्ती तलाव प्रदीर्घ काळानंतर जलपूर्ण झाला आहे.

रायगड किल्ल्यावरील रहिवाशांनी माहिती देताना सांगितले की,, गेल्या सुमारे शंभर ते दीडशे वर्षांच्या काळात हत्ती तलावात इतके पाणी प्रथमच साठले आहे. रायगडाच्या चित्त दरवाज्याच्या पायऱ्या जिथे संपतात, तिथे शिरकाई देवीचे मंदिर आहे. त्याच्या जवळच हत्ती तलाव आहे. राज्याभिषेकासाठी गडावर चढविण्यात आलेल्या हत्तींना डुंबण्याची सोय या तलावामुळे झाली होती. हत्ती तलावाची लांबी २०८ बाय ३०० फूट इतकी आहे. मात्र मूळचे नैसर्गिक चढउतार कायम ठेवल्याने तलावाची खोली कमी-जास्त स्वरुपाची आहे. सर्वाधिक खोली ३५ फूट आहे. गडाचा विस्तार १२०० एकराचा असून, त्यामध्ये तब्बल ८४ पाणी साठे आहेत, अशी माहिती रायगड विकास प्राधिकरणाचे वास्तु संवर्धक वरुण भामरे यांनी दिली.

‘रायगडावरील गंगासागर तलाव ही सर्वांत मोठी पाणीसाठ्याची जागा आहे. त्याखालोखाल हत्ती तलावात पाणीसाठा होतो. मात्र इतकी वर्षे तलावात प्रचंड गाळ साठल्याने तलाव त्याचे मूळ सौंदर्य हरवून बसला होता. प्राधिकरणामार्फत सुरू करण्यात अालेल्या कामात तलावातील गाळ काढण्यासाठी प्राधान्य दिले होते. तसेच तलावाची गळती रोखण्याचे कामही युद्धपातळीवर सुरू केले. तलावाची भिंत ज्या ठिकाणी आहे, तिथे तलावाची खोली ३५ फूट आहे. इतरत्र ती विविध प्रकारची आहे, असे भामरे यांनी सांगितले.

शंभरहून अधिक वर्षांनी तलाव भरल्याचे पाहिले

१० जुलै रोजी गडावरून तेथील रहिवाशांचा फोन आला, की गडावरील हत्ती तलाव पूर्ण भरला आहे. चौकशी केल्यावर समजले, की दुर्गराज रायगडावरील ७५ वर्षे वयाच्या एका ज्येष्ठांनी त्यांच्या अगदी लहानपणापासून तलाव पूर्ण भरल्याचे कधी पाहिले नव्हते. तसेच त्यांच्या वडिलांच्या काळापासूनही तलाव पूर्ण भरल्याचे अाठवत नव्हते. त्यामुळे सुमारे १०० वर्षांनंतर हा तलाव पूर्ण भरल्याचे दृष्य आता दिसत आहे. तलाव भरल्याने स्थानिकांना देखील अानंद झाला अाहे. रायगडाच्या जतन-संवर्धनाचे काम प्राधिकरणामार्फत सुरू आहे. त्याला आता यश मिळताना दिसत आहे.

पारंपारिक पद्धतीचा वापर

रायगडावरील काही वास्तूंची पुनर्उभारणी, पुनर्बांधणी करण्यात येणार आहे. त्यासाठी पारंपरिक पद्धतीचा वापर केला जात आहे. मुख्यत: चुना, बेलफळ आणि सुर्की (विशिष्ट विटांची भुकटी) यांची विविध प्रकारची मिश्रणे वापरून बांधकाम केले जात आहे. गडावरील हजारपेक्षा अधिक पायऱ्यांची बांधणीही या पद्धतीने करण्यात आली आहे. गळती रोखण्यासाठीही पारंपरिक पद्धती वापरण्यात येत आहेत. - वरुण भामरे, वास्तुसंवर्धक, रायगड विकास प्राधिकरण

गडावरील पाणी साठ्यांचे वैशिष्ट्य

- गडाचा परिसर १२०० एकर

- ८४ लहानमोठे पाणीसाठे

- गंगासागर तलाव सर्वांत मोठा

- त्याखालोखाल हत्तीतलाव, कुशावर्त आदी तलाव

- गडावर त्या काळात रेन वॉटर हार्वेस्टिंग सिस्टीम

- पावसाचे पाणी कुशावर्त तलावात एकत्रित करण्याची योजना

बातम्या आणखी आहेत...