आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज्यात संततधार, धरणे काठोकाठ:पुढील 3 दिवस पाऊस; जायकवाडीचा साठा 63 टक्के, कोयनाचे 6 दरवाजे उचलले

पुणेएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
विदर्भात भामरागड गावात पूर, १०० गावांचा संपर्क तुटला - Divya Marathi
विदर्भात भामरागड गावात पूर, १०० गावांचा संपर्क तुटला
  • 17ते 19 ऑगस्टदरम्यान तीन दिवस राज्यात मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता

गेल्या आठवडाभरापासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे राज्यातील बहुतेक धरणांच्या पाणीसाठ्यात समाधानकारक वाढ झाली आहे. विशेषत: कृष्णा, भीमा, गोदावरी, कोयना नद्यांच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पावसामुळे धरणांमधील आवक वेगाने वाढत आहे. बहुतेक धरणांतून ८० टक्क्यांपेक्षा अधिक पाणीसाठा जमा झाला आहे. रविवारी जायकवाडीचा पाणीसाठा ६३.२१ टक्के इतका झाला होता. दरम्यान, राज्यात येत्या तीन दिवसांत पावसामध्ये सातत्य राहणार असल्याचे वृत्त भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) दिले आहे. विशेषत: पश्चिम महाराष्ट्र, घाटमाथा आणि मराठवाड्यात तसेच विदर्भाच्या काही भागात मुसळधार पावसाचा अंदाज आहे.

सोमवारपासून तीन दिवस मुसळधार

१७ ते १९ ऑगस्टदरम्यान तीन दिवस राज्यात मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता आहे. अरबी समुद्र आणि बंगालचा उपसागर दोन्हीकडे कमी दाबाचे क्षेत्र कार्यरत आहे. वाऱ्यांची दिशा अनुकूल व चक्राकार असल्याने अनुकूल स्थिती आहे. - डॉ. जीवनप्रकाश कुलकर्णी, ज्येष्ठ हवामानतज्ञ

मांजरा प्रकल्पात अजूनही ०% साठा

मराठवाड्यातल्या सर्व ८७३ प्रकल्पांत ५१ टक्के इतका पाणीसाठा झाला आहे. यामध्ये येलदरी आणि सिद्धेश्वर धरणे १०० टक्के भरली आहेत, तर दुधना ४२ टक्के, माजलगाव ६८ टक्के, मानार ६९, ऊर्ध्व पैनगंगा ५७ टक्के भरले आहे. मांजरा प्रकल्पात अजूनही शून्य टक्क्याच्या खाली पाणीसाठा आहे.

पानशेत धरण भरले ९४ टक्के

पुणे परिसरातील धरणसाखळीत रविवारी दुपारपर्यंत ८३.८६% पाणीसाठा झाला असल्याचे पाटबंधारे विभागाने सांगितले. खडकवासला धरणातून गेले तीन दिवस सातत्याने मुठा नदीत पाण्याचा विसर्ग सुरू आहे. तो रविवारीही सुरू होता. पानशेत धरणही ९४% भरले आहे. वरसगाव धरणात ८०%, तर टेमघर धरणात ६४% पाणीसाठा झाला आहे. त्यामुळे पुणे परिसरातील धरणसाखळीत आता २४.४४ टीएमसी पाणीसाठा आहे.

कृष्णा खोऱ्यातील धरणे ८०% भरली

कृष्णा खोऱ्यातील धोम, कण्हेर, उरमोडी, तारळी, कोयना, वारणा, कासारी, तुळशी, राधानगरी, दूधगंगा, पाटगाव ही धरणेही ८० टक्क्यांपेक्षा अधिक भरली आहेत. त्यामुळे कोयना, कृष्णा, उरमोडी, पंचगंगा, तुळशी, भोगवती, दूधगंगा या नद्या दुथडी भरून वाहत आहेत, अशी माहिती पाटबंधारे मंडळाचे अधीक्षक अभियंता सं. द. चोपडे यांनी दिली. कोयना धरणात येणाऱ्या पाण्याचे प्रमाण पाहता धरणाचे सहा वक्री दरवाजे दहा इंच उचलण्यात आले आहेत. त्यामुळे कोयना नदीत ५४ हजार २४६ क्युसेकने विसर्ग सुरू आहे. चांदोली धरणातूनही विसर्ग सुरू आहे. औदुंबर दत्त मंदिर पाण्याखाली गेल्याचे वृत्त आहे. नागठाणे बंधारा पूर्ण भरला आहे.

खान्देशात अक्कलपाडा, हतनूरचे दरवाजे उघडले

जळगाव | खान्देशात अनेक मध्यम व मोठे प्रकल्प आेव्हरफ्लो झाले आहेत. धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यात असलेल्या कान नदीवरील मालनगाव आणि जामखेडी मध्यम प्रकल्प तुडुंब भरलेे. त्यामुळे अक्कलपाडा मध्यम प्रकल्पाचे आठ दरवाजे रविवारी दुपारी तीन वाजता ०.५० मीटरने उघडण्यात आले. धरणातून ८ हजार ५०० क्युसेक विसर्ग पांझरा नदीत होत आहे. त्यामुळे नदीकाठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. हतनूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील पाऊस ओसरल्याने धरणातून केवळ १४ दरवाजांतून विसर्ग होत आहे.

विदर्भात भामरागड गावात पूर, १०० गावांचा संपर्क तुटला

नागपूर | गडचिरोली जिल्ह्यात पर्लकोटा नदीला पूर आला असून पुराचे पाणी भामरागड गावात शिरले आहे. यामुळे परिसरातील शंभर गावांचा संपर्क तुटला आहे. अनेक घरे आणि दुकाने पाण्याखाली गेली आहेत. भामरागडमधील सुमारे ५० कुटुंबीयांनी स्वत: सुरक्षित ठिकाणी आश्रय घेतला आहे.

बातम्या आणखी आहेत...