आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराव्यंगचित्र चितारण्यासाठी माझा हात दररोज शिवशिवतो खरा. पण, चित्र काढण्यासाठी आवश्यक ती बैठक आणि शांतता मिळत नसल्याने व्यंगचित्र काढण्यासाठी वेळ होत नाही. त्यामुळे कदाचित माझी व्यंगचित्रे बऱ्याचदा शब्द रुपाने भाषणातूनच बाहेर पडतात, अशी मार्मिक टिप्पणी व्यंगचित्रकार आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शुक्रवारी येथे केली.
जागतिक व्यंगचित्र दिनाचे औचित्य साधून युवा संवाद सामाजिक संस्था आणि कार्टुनिस्ट कम्बाईन यांच्या वतीने आयोजित पुणे आंतरराष्ट्रीय व्यंगचित्र महोत्सवाचे उद्घाटन राज ठाकरे यांच्या हस्ते झाले. त्याप्रसंगी ते बोलत होते. प्रसिद्ध व्यंगचित्रकार चारुहास पंडित, युवा संवाद सामाजिक संस्थेचे अध्यक्ष धनंजय गरड, कार्टुनिस्ट कम्बाईनचे अध्यक्ष संजय मिस्त्री आणि सचिव योगेंद्र भगत या वेळी उपस्थित होते.
रत्नागिरीच्या दौऱ्यावर जाण्यासाठी पुण्याला येणार होतो. चारुहास पंडित यांच्या निमंत्रणावरून इथे टोल भरायला आलो, अशी सुरुवात करून राज ठाकरे म्हणाले, व्यंगचित्र हा माझ्या आवडीचा विषय असल्याने इथे येणे स्वाभाविक होते. प्रभाकर झळके नाशिकहून येऊ शकतात तर मला इथे येणे भागच होते. कला आपल्याला जे दाखविते ते विलक्षण असते. खरं तर ही भाषण करण्याची वेळ नाही. मी केवळ शुभेच्छा देण्यासाठी आलो आहे. माझ्याकडून काय सहकार्य हवे ते कार्टुनिस्ट कम्बाईन संस्थेने अगदी हक्काने सांगावे, असे राज म्हणाले. गरड यांनी प्रास्ताविक केले. पंडित आणि मिस्त्री यांनी मनोगत व्यक्त केले. राजेश दामले यांनी सूत्रसंचालन केले.
3 मिनिटांत अजित पवार साकारले
कोऱ्या कॅनव्हावर रेषांच्या फटकाऱ्यांने अवध्या तीन मिनिटांमध्ये राज ठाकरे यांनी व्यंगचित्र साकारून आपल्या कलेवरची हुकूमत दाखविली. रसिकांच्या आग्रहाखातर त्यांनी अवघ्या तीन मिनिटांमध्ये अजित पवार यांचे अर्कचित्र साकारले. ‘खूप दिवसांनी कुंचला हाती धरला आहे. बाळासाहेबांप्रमाणे बैठक मारून चित्र काढण्याची सवय आहे. त्यामुळे जे व्यंगचित्र काढले आहे ते गोड मानून घ्या’, असेही राज ठाकरे यांनी सांगितले.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.