आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशिर्डी येथे 10 मे रोजी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अधिवेशन आयोजित करण्यात येणार असल्याचे केंद्रीय राज्यमंत्री व रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खा.रामदास आठवले यांनी आज जाहीर केले . काल महाबळेश्वर येथे पक्षाची कार्यकारणी बैठक व चिंतन शिबिर आयोजित केले होते त्या पार्श्वभूमीवर बुधवारी पुण्यात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी आठवले बोलत होते.
पुढे ते म्हणाले की ,लवकरच मंत्रिमंडळ विस्तार होणार असून रिपब्लिकन पक्षाला मंत्रिमंडळात स्थान मिळावे, विधानपरिषदेत स्थान मिळावे. आमच्या पक्षाला निर्णय प्रक्रियेत विचारात घेण्यात यावे तसेच महापालिका व जिल्हा परिषद निवडणुका लवकर घ्याव्यात. जेणेकरून जिल्हा आणि तालुका स्तरातील कार्यकर्त्यांना त्यामुळे सत्तेत सहभागी होता येईल. या मागण्यांसाठी आम्ही देवेंद्र फडणवीस व भाजपा चे वरिष्ठ नेते यांना भेटणार आहोत.
पुण्यातील कसबा आणि चिंचवड या विधानसभेच्या पोटनिवडणुका बिनविरोध व्हाव्यात अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली .
उध्दव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर यांच्या युतीला शिवशक्ती व भीमशक्ती युती म्हणता येणार नाही. कारण खरी भीमशक्ती आमच्यासोबत आहे .त्यामुळे ठाकरे आणि आंबेडकर यांची युती यशस्वी होणार नाही, असेही आठवले यावेळी म्हणाले .भाजपा संविधान बदलणार या अफवा आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी संविधान टीकवणारे आहेत. त्यांनी अनेक योजना दलित समाजासाठी आणल्या आहेत. तसेच इंदू मिल स्मारक अथवा इतर डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचे विषय तत्काळ मार्गी लागत आहेत .त्यामुळे खरी भीमशक्ती आमच्या पाठीशी असल्याचे मत आठवले यांनी व्यक्त केले.
या पत्रकार परिषदेस प्रदेश संघटक सचिव परशुराम वाडेकर , शहराध्यक्ष शैलेश चव्हाण, महिला प्रदेशाध्यक्षा चंद्रकांता सोनकांबळे , प्रदेश उपाध्यक्ष बाळासाहेब जानराव ,विशाल शेवाळे ,युवक अध्यक्ष विरेन साठे यासह पुणे शहरातील प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते .
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.