आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिकाला उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नावाच्या माेबाइल क्रमांकाचा वापर करून एका जमिनीचा वाद मिटवण्यासाठी २० लाख रुपये खंडणी मागण्यात आल्याचा प्रकार घडला आहे. याप्रकरणी बंड गार्डन पाेलिस ठाण्यात आराेपीविराेधात गुन्हा दाखल करण्यात आला असून गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने या संदर्भात सहा आराेपींना जेरबंद केले आहे. सुनील गाैतम वाघमारे (वय-२८), नवनाथ भाऊसाहेब चाेरमले (२८), किरण रामभाऊ काकडे (२५), आकाश शरद निकाळजे (२४), साैरभ नारायण काकडे (२०), चैतन्य राजेंद्र वाघमारे (१९, सर्व रा.पुणे) अशी अटक करण्यात आलेल्या आराेपींची नावे आहेत. याबाबत बांधकाम व्यावसायिकाने पाेलिसांकडे फिर्याद दाखल केली हाेती. आराेपींनी संगनमत करून फेक काॅल ॲप डाऊनलाेड केले. या अॅपद्वारे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या माेबाइल क्रमांकाचा वापर करून त्यावरून त्यांनी बांधकाम व्यावसायिकाला फाेन केला. त्यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा पीए चाैबे बाेलताेय असे सांगितले.
वाडेबाेल्डाई येथील शिरसाटवाडी येथील बाबा भाऊ चाेरामले व इतर नऊ जणांच्या मालकीच्या गट क्रमांक ८५/१, ८५/३, व ८७ मधील एकूण सहा हेक्टर जमिनीसंदर्भातील वाद मिटवून टाका, असे सांगत बिल्डरला गावात पाऊल ठेवू देणार नाही, तुमचा काेणताही प्रकल्प हाेऊ देणार नाही, अशी धमकी देत २० लाख रुपये खंडणीची मागणी करण्यात आली. व्यावसायिकाने घाबरून जाऊन त्यापैकी दाेन लाख रुपये आराेपींना दिले. मात्र, त्यास संशय आल्याने त्याने याबाबत पाेलिसांना माहिती दिली आणि गुन्हे शाखा एकच्या पथकाने कारवाई करत आराेपींना जेरबंद केल्यानंतर संबंधित प्रकार उघडकीस आला. याबाबत पुढील तपास वरिष्ठ पाेलिस निरीक्षक शैलेश संखे करत आहेत.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.