आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आरोग्य यंत्रणेचा मुद्दा:कोरोनाला अटकाव करण्यासाठी रॅपिड टेस्ट, ऑक्सिजन बेड्स वाढवण्याची गरज, पत्रकार पांडुरंग रायकर यांच्या मृत्यूने प्रशासनातील त्रुटी ठसठशीतपणे समोर

पुणे,नाशिक,मुंबई3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • खासगी रुग्णालयांवर सरकारचे नियंत्रण नाही : देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते

पुण्यात पत्रकार पांडुरंग रायकर यांचा मृत्यू झाल्याने बेफिकीर प्रशासन आणि ढिसाळ आरोग्य यंत्रणेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. पुण्यासह राज्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस झपाट्याने वाढत आहेत. चाचणी केल्यानंतर उशीरा मिळणारे अहवाल, जम्बो कोविड संेटर उभारूनही त्या ठिकाणी आरोग्य यंत्रणाच पुरेशी नसल्याने त्या निरुपयोगी ठरत आहेत. या पार्श्वभूमीवर ‘दिव्य मराठी’ने माजी आरोग्यमंत्र्यांसह आरोग्य क्षेत्रातील तज्ञांशी चर्चा केली असता चाचणी आणि निदान यातील अंतर कमी करण्यासाठी रॅपिड चाचण्याचे प्रमाण, होम क्वाॅरंटाइन, ऑक्सिजन बेडस््ची संख्या वाढवण्याची गरज असल्याचे मत तज्ञांनी व्यक्त केले.

मुंबईत जशा इनोव्हा गाड्या, बेस्ट बसना रुग्णवाहिका केले, तसे राज्याच्या उर्वरित भागात करता आले असते. छोटा हत्ती, कालीपिली याचा वापर करु शकलो असतो. असे मत माजी आराेग्य मंत्री डाॅ. दिपक सावंत यांनी व्यक्त केले.

अंमलबजावणीत राज्य सरकारच्या गंभीर त्रुटी
पुण्यात साथ आटाेक्यात येत नसल्याने ज्येष्ठ नागरिकांचे दररोज मॉनिटरिंग करावे, त्यांना ऑक्सिजनची व्यवस्था करू शकलो तर व्हेंटिलेटर्स कमी पडणार नाहीत हे मी पंधरा दिवसांपूर्वी शासनासोबतच्या प्रत्येक बैठकीत मांडले आहे, मात्र त्याची अंमलबजावणी केली जात नाही. -डॉ सुभाष साळुंखे, माजी संचालक, आरोग्य विभाग

काँटॅक्ट ट्रेसिंगचा अभाव, बेजबाबदारपणा जबाबदार
जे प्रशासकीय अधिकारी कारभार करीत आहेत त्यांना वैद्यकीय वास्तवाचे भान नाही आणि जे वास्तव भोगत आहेत त्यांचे ऐकून घेतले जात नाही, ही कोरोना व्यवस्थापनातील मोठी चूक आहे. पंधरा दिवसांनंतरच्या परिस्थितीचा अंदाज येऊनही बेड्स, औषधे, रुग्णवाहिका, डॉक्टर्स, व्हेंटिलेटर्स यांचे नियोजन नाही ही शासनाच्या व्यवस्थापनाच्या पातळीवरील मोठी कमतरता आहे. रुग्णांचे लवकर निदान ,काँटॅक्ट ट्रेसिंग ही साथ रोखण्यासाठी अत्यावश्यक खबरदारी आहे. - डॉ अविनाश भोंडवे, अध्यक्ष, आयएमए

कोविड सेंटर उभारले; पण पुरेशी यंत्रणाच नाही
पुण्यात कोविड सेंटर उभारले जाते, पण सरकार त्याला यंत्रणा देत नाही. आरोग्य क्षेत्रातली ही गैरव्यवस्था पत्रकार पांडुरंग रायकरच्या मृत्यूला जबाबदार आहे. अॅम्ब्युलन्स व बेड न मिळाल्याने रायकरप्रमाणे राज्यात हजारोंचे बळी गेले आहेत. सरकार कोरोनावर उपाययोजना करण्यात अपयशी ठरले आहे. - प्रवीण दरेकर, विरोधी पक्षनेते, विधान परिषद

खासगी रुग्णालयांवर सरकारचे नियंत्रण नाही
राज्यात कोरोनाचा प्रकोप आणि मृत्यूसुद्धा वाढत आहेत. देशातल्या एकूण काेरोना मृत्यूंत महाराष्ट्राचा वाटा ३८ टक्के आहे. चाचण्यांची संख्या वाढवायला हवी. विलगीकरण वाढवले तरच संसर्गाचे प्रमाण कमी हाेईल. खासगी रुग्णालयांवर राज्य सरकारचे नियंत्रण नाही. राज्यातली परिस्थिती गंभीर आहे. पत्रकाराचा उपचाराअभावी मृत्यू होतो, तिथे सामान्यांचे किती हाल असतील? - देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते, विधानसभा