आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुणे:वर्षभरापासून फरार असलेला रवींद्र बऱ्हाटे अखेर जेरबंद, कोट्यवधींचा मालक बनला होता फकीर

पुणेएका वर्षापूर्वीलेखक: मंगेश फल्ले
  • कॉपी लिंक

राज्यातील मोठ्या राजकीय नेत्यांपासून, शिक्षणसम्राट, उद्योजक आणि पोलिसांपर्यंत अनेकांच्या गैरव्यवहारांच्या कुंडल्या माहिती अधिकार कायद्याद्वारे बाहेर काढून त्यानंतर जमीन लाटणे आणि फसवणूक प्रकरणी मकोका गुन्ह्यातील फरार असलेला माहिती अधिकार कार्यकर्ता रवींद्र बऱ्हाटे याला अटक करण्यात पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेला वर्षभरानंतर यश आले आहे. तब्बल तीन हजार कोटींचा मालक असलेला बऱ्हाटे पोलिसांना गुंगारा देण्यासाठी वर्षभरापासून वेशांतर करून फकीर बनल्याची माहिती तपासात समोर आली आहे.

बऱ्हाटे गेल्या दोन महिन्यांपासून शांताराम पाटील या नावाने पुण्यातच वास्तव्य करत होता. पोलिसांना गुंगारा देण्यासाठी तो वेशांतर करून वावरत होता. गुजरात, राजस्थानसह मुंबई, सोलापूर, डहाणू, नंदुरबार आदी ठिकाणी पोलिसांनी वर्षभर छापेमारी करत त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो पुरावा मागे सोडत नसल्याने त्याला पकडण्यात अडथळे येत होते. फरार असल्याच्या काळात त्याने स्वतःचे निर्दोषत्व सिद्ध करण्यासाठी दोन व्हिडिओ फेसबुकवर टाकले होते आणि त्याचा आधार घेत पोलिसांनी त्याला मदत केल्याच्या कारणावरून त्याची पत्नी संगीता, मुलगा मयूर, वकील सुनील मोरे, सहकारी धनंजय पितांबरे यांना अटक केली. त्यानंतर पोलिसांनी बऱ्हाटेची विवाहित मुलगी आणि जावई यांच्याकडे चौकशी सुरू केल्याने तो मेटाकुटीला आला आणि पोलिसांच्या जाळ्यात अडकला. जमीन कागदपत्रांत फेरफार, खंडणी, फसवणूक आणि जमीन बळकाविण्याचे १२ गुन्हे त्याच्यावर दाखल आहेत. त्यापैकी तीन गुन्ह्यांमध्ये त्याच्याविरुद्ध मकोकानुसार कारवाई करण्यात आली आहे. बऱ्हाटेसह १३ जणांवर मकोकानुसार गुन्हे दाखल करण्यात आले असून आतापर्यंत १६ जणांना अटक करण्यात आलेली आहे. सात जुलै २०२० रोजी बऱ्हाटेविरुद्ध कोथरूड पोलीस ठाण्यात पहिला गुन्हा दाखल करण्यात आला होता. ऑक्टोबर २०२० मध्ये त्याच्यावर मकोकानुसार कारवाई करण्यात आली. त्यानंतर त्याला फरार घोषित करून त्याची मालमत्ता जप्त करण्याची कारवाई महसूल विभागाने सुरू केली होती.

कुटुंबावर कारवाई केल्यामुळे हजर झालो
‘दिव्य मराठी’शी बोलताना रवींद्र बऱ्हाटे म्हणाला, ‘मी निर्दोष असून माझ्याविरोधात षड‌्यंत्र रचून मला अडकवण्याचा प्रयत्न केला गेला. अनधिकृत इमारतींबाबतची प्रकरणे बाहेर काढल्याने माझ्यावर कारवाई करण्यात आली. माझ्या कुटुंबावर पोलिसांनी कारवाई केल्याने मी हजर झालो. अनेक जणांची भ्रष्टाचार प्रकरणे माझ्याकडे असून लवकरच ती उघड करणार आहे.’

बातम्या आणखी आहेत...