आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जनतेने धनशक्तीविरोधात निवडणूक हाती घेतली:भाजपकडून पैसे घेऊन माझ्यावर मतांचा पाऊस पाडला, रवींद्र धंगेकरांनी व्यक्त केला आनंद

पुणे20 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

कसबा विधानसभा निवडणूक राज्यभरात प्रतिष्ठेची करण्यात आली होती. निवडणुकीत सत्ताधारी त्यांच्याकडून प्रशासकीय यंत्रणेचा गैरवापरही करण्यात आला. त्याचप्रमाणे मतदार संघात मोठ्या प्रमाणात पैशांचा पाऊस पाडला गेला. मात्र जनतेने धनशक्ती विरोधात स्वतःच निवडणूक हाती घेऊन मतांचा पाऊस माझ्यावर पाडल्याने माझा विजय सुकर झाल्याची भावना महाविकास आघाडीचे विजयी उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी व्यक्त केली आहे.

धंगेकर म्हणाले, कसबा मतदार संघ हा भारतीय जनता पक्षाचा बालेकिल्ला कधीच नव्हता. विविध समविचारी पक्ष हे आत्तापर्यंत वेगवेगळे लढत असल्याने त्याचा फायदा भाजपला होऊन त्यांचे उमेदवार विजयी होत होते. मात्र, यंदा सर्व पक्ष एकत्रित आल्याने त्याचा फायदा मला मिळालेला आहे आणि 28 वर्षांनंतर याठिकाणी विरोधी उमेदवार विजयी होऊ शकला आहे.

मतांमध्ये आघाडी

भाजपचा हक्काचा परिसर असलेल्या सदाशिव पेठ, शनिवार पेठ , नारायण पेठ आदी भागातूनही भाजप उमेदवारापेक्षा मलाच अधिक मते मतदारांनी दिलेली आहे. सर्व जातीभेद विसरून मतदार माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याच्या पाठीशी उभे राहिल्याचे यातून दिसून येत आहे. पहिल्या फेरीच्या लढतीपासून अखेरच्या लढतीपर्यंत मतदारांनी मला मतामध्ये आघाडी दिली.

मते मात्र मलाच दिली

कसब्याच्या निवडणुकीत राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसह अनेक दिग्गज नेते प्रचाराच्या रिंगणात उतरले. मात्र मी ज्या दिवशी निवडणुकीचा अर्ज दाखल केला, तेव्हापासून जनतेचा कौल हा माझ्या पाठीशी होता. आजचा विजय लोकशाहीचा आणि जनतेचा विजय आहे. भाजपकडून मतदारांना प्रलोभने दाखवण्यासाठी मोठ्या प्रमाणात पैशांचा वापर करण्यात आला. मात्र, मतदारांनी भाजपच्या पदाधिकाऱ्यांना पैसे परत केले किंवा घरीच ठेवले. मते मात्र मलाच दिलेली आहे.

कुरघोडीचे राजकारण केले नाही

या निवडणुकीच्या माध्यमातून जाती-धर्म विरहित जनतेचा रेटा आपण लक्षात घेतला पाहिजे. स्वर्गीय आमदार मुक्ता टिळक यांची जी कामे अपूर्ण आहेत, ती पूर्ण करण्याचा प्रयत्न मी माझ्या काळात करेल. टिळक यांनी त्यांच्या कारकीर्दीत कधीही कुरघोडीचे राजकारण केले नव्हते. मात्र, सध्याचे भाजप कुरघोडीच्या राजकारणावरच टिकून आहे.

बातम्या आणखी आहेत...