आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एमपीएससीचा महत्त्वाचा निर्णय:महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत आयोजित विविध स्पर्धा परीक्षांच्या पद्धतीमध्ये सुधारणा

पुणे14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत शासन सेवेतील विविध संवर्गाकरीता राबविण्यात येणाऱ्या विद्यमान भरतीप्रक्रियेमुळे परीक्षांची वाढलेली संख्या, उमेदवार व प्रशासकीय यंत्रणेवर येणारा ताण, भरती प्रक्रियेस होणारा विलंब, गुणवत्ता राखण्यासाठी सतत करावे लागणारे प्रयत्न, प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करुन करावयाच्या विविध उपाययोजना, भविष्यामधील भरतीप्रक्रियेचे नियोजन या व इतर अनुषंगिक बाबींचा साकल्याने विचार करुन आयोगामार्फत आयोजित विविध स्पर्धा परीक्षांच्या पद्धतीमध्ये सोमवारी सुधारणा करण्याचा आयोगाकडून निर्णय घेण्यात आला आहे.

स्पर्धा परीक्षेमधून भरण्यात येणाऱ्या सर्व राजपत्रित गट-अ व गट-ब संवर्गाकरीता यापुढे पारंपारिक वर्णनात्मक स्वरूपाच्या मुख्य परीक्षेच्या आधारे निवड प्रक्रिया राबविण्यात येईल. राज्यसेवेसह सर्व राजपत्रित गट-अ व गट ब संवर्गातील पदभरतीकरीता महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा (महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित एकत्रित प्राथमिक परीक्षा) या नावाने एकच संयुक्त पूर्व परीक्षा घेण्यात येईल.

स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून भरण्यात येणाऱ्या सर्व राजपत्रित गट-अ व गट-ब संवर्गाकरीता यापुढे महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व स्पर्धा परीक्षेद्वारे भरतीप्रक्रिया राबविण्यात येईल. महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षेकरीता उमेदवारांकडून अर्ज घेताना विज्ञापित सर्व संवर्गाकरीता अर्हतेवर आधारित संवर्गाचा विकल्प घेण्यात येईल. महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षेच्या निकालाधारे मुख्य परीक्षेच्या प्रवेशासाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांकरीता संबंधित संवर्गासाठी (उदा. राज्यसेवा मुख्य परीक्षा, स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा, वनसेवा मुख्य परीक्षा, कृषि सेवा मुख्य परीक्षा इत्यादी) निश्चित करण्यात येणाऱ्या स्वतंत्र परीक्षा योजना व अभ्यासक्रमानुसार मुख्य परीक्षा घेण्यात येईल.

सर्व अराजपत्रित गट-ब व गट-क संवर्गासाठी महाराष्ट्र अराजपत्रित सेवा संयुक्त पूर्व परीक्षा या नावाने एकच संयुक्त पूर्व परीक्षा घेण्यात येईल. तसेच, सदर संयुक्त पूर्व परीक्षेच्या आधारे स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून भरण्यात येणाऱ्या सर्व अराजपत्रित गट-ब व गट-क संवर्गासाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येईल.

बातम्या आणखी आहेत...