आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशिक्षण हक्क कायद्याअंतर्गत राबवल्या जाणाऱ्या आरटीई प्रवेशाची नियमित फेरी संपल्यावर राज्यातील फक्त ६१ हजार, ५६९ बालकांचा प्रवेश निश्चित झाल्याची आकडेवारी समोर आली आहे. याचाच अर्थ, राज्यभरात उपलब्ध असलेल्या एक लाख, एक हजार, ९०६ जागांपैकी २९ हजार ११६ बालकांनी लॉटरीद्वारे प्रवेश मिळवूनही आरटीईअंतर्गत प्रवेश घेतलेले नाहीत. यापुढे प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याची प्रक्रिया पुढच्या आठवड्यापासून सुरू केली जाईल, असे शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले आहे.
राज्यभरात ९०८६ शाळांमध्ये एकूण एक लाख, एक हजार, ९०६ बालकांची प्रवेशक्षमता आहे. या जागांसाठी राज्यभरातून एकूण २ लाख, ८२ हजार, ७८३ अर्ज प्राप्त झाले होते. लॉटरीद्वारे यापैकी ९० हजार, ६८५ बालकांना प्रवेश देण्यात आले होते. मात्र प्रत्यक्षात विहित मुदतीत (दोन वेळा मुदतवाढ देऊनही) फक्त ६१ हजार, ५६९ बालकांचेच प्रवेश निश्चित झाले आहेत.
शुल्क घेणाऱ्या शाळांवर कारवाई करा
आरटीईअंतर्गत बालकांना मोफत प्रवेश व शिक्षण दिले जाते. मात्र, अनेक शाळा आरटीईअंतर्गत असूनही विद्यार्थ्यांकडून या ना त्या कारणांवरून शुल्क वसूल करतात. आर्थिकदृष्ट्या अक्षम पालकांना हे शुल्क भरणे शक्य नसल्याने असे पालक प्रवेश मिळूनही प्रत्यक्ष प्रवेश घ्यायला कचरतात. अशा शाळांवर शिक्षण विभागाने कारवाई केली पाहिजे, असे मत पालक युनियनचे मुकुंद किर्दत यांनी यासंदर्भात व्यक्त केले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.