आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काळाबाजार:पुण्यात 1,100 च्या रेमडेसिविरची 11,000 रुपयांत विक्री; डॉक्टर्स, नर्सकडून गरजेपेक्षा जास्तीची मागणी, अतिरिक्त इंजेक्शन घेऊन दुसऱ्या रुग्णाला चढ्या दराने विक्री

पुणे9 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • शहरात सध्या रेमडेसिविर औषध मिळवण्यासाठी लांबचलांब रांगा लागल्या असून चांगलीच गर्दी आहे.

कोविडमुळे उद्भवलेल्या आपत्कालीन परिस्थितीत रुग्णांना रेमडेसिविर इंजेक्शनची गरज आहे, ही बाब हेरून काळाबाजार करणाऱ्यांमध्ये प्रामुख्याने विविध हॉस्पिटलमधील डॉक्टर, नर्स, इंजेक्शनची देखरेख करणारे रुग्णांना आवश्यकतेपेक्षा जादा इंजेक्शनची मागणी करतात. रुग्णांचे नातेवाईक, कुटुंबीयांनी इंजेक्शन आणल्यानंतर त्यातील काही इंजेक्शनचा वापर करण्यात येतो. मात्र, उर्वरित इंजेक्शन इतर गरजू रुग्ण पाहून त्यांना चढ्या दराने विक्री करण्यात येतात.

यामध्ये पोलिसांना काही प्रकरणांत सॅम्पल म्हणून मेडिकल अथवा हॉस्पिटलमध्ये पाठवलेल्या इंजेक्शनचाही काळाबाजार हाेण्याचा प्रकार समोर आला आहे, अशी माहिती पुणे गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त श्रीनिवास घाडगे यांनी दिली. केमिस्ट असोसिएशन ऑफ पुणे संघटनेच्या शुक्रवारपेठेत कुमार प्रेस्टिज पॉइंट या दुकानातून १,१०० रुपयांत रेमडेसिविरची विक्री केली जाते. मात्र हेच इंजेक्शन काळ्याबाजारात पुण्यात १० ते ११ हजार तर चिंचवडमध्ये ११ ते १५ हजार रुपयांत विकले जात असल्याचे पोलिसांनी सांगितले.

पुण्यात मागवली ३५०० इंजेक्शन्स
पुण्यातील तुटवडा पाहता जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांनी दिल्ली येथील प्रोटेक्ट लाइफ या कंपनीशी समन्वय साधून साडेतीन हजार इंजेक्शन्स दिल्ली येथून विमानाने पुण्यात गुरुवारी मागवून घेतली. जिल्हा कोअर कमिटीच्या निर्णयानुसार जिल्ह्यातील विविध रुग्णालयांत थेट दिली जाणार आहेत.

रुग्णांची संख्या वाढल्याने मागणीपेक्षा पुरवठा कमी
देशभरात रेमडेसिविर इंजेक्शनची निर्मिती हिट्रो, सिप्ला, सनफार्म, मायलॉन या सात कंपन्या करत आहेत. हैदराबाद येथील हिट्रो कंपनी यापैकी सर्वात मोठी उत्पादक कंपनी असून ती दरदिवशी सुमारे ३५ हजार इंजेक्शन निर्माण करते, तर उर्वरित सहा कंपन्या ३० हजारपर्यंत दरदिवशी उत्पादन करतात. रेमडेसिविर इंजेक्शन्सची निर्मिती करण्यास साधारण १५ ते १५ दिवसांचा कालावधी लागतो. मागील दोन आठवड्यांत अचानक कोरोना रुग्णसंख्या झपाट्याने वाढून इंजेक्शन मागणी वाढली आहे. त्यामुळे पुरवठा कमी आणि मागणी जास्त असे चित्र राज्यभरात निर्माण झाले आहे. सध्या पुण्यात दरदिवशी १८ हजार इंजेक्शनची मागणी असून तुटवड्यामुळे ती दररोज ४५ हजारपर्यंत वाढली आहे.

पाच जणांना अटक; सात इंजेक्शन आरोपींकडून जप्त
रेमडेसिविरचा काळाबाजार करणाऱ्या एकूण ५ जणांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून ७ इंजेक्शन जप्त करण्यात आले. यातील काही आरोपींनी तर रुग्णालयातीलच इंजेक्शन विक्रीसाठी आणले होते. मोहंमद महिरुख पठाण (२८), परवेज मैनुद्दीन शेख (३६), इम्तियाज युसूफ अजमेरी (५२), अश्विन विजय सोलंखी (४१) यांच्यावर चंदननगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून सर्वांना अटक केली आहे. दोन वेगवेगळ्या घटनांत पोलिसांनी हॉस्पिटल आणि मेडिकलसंबंधी व्यक्तींनाच या इंजेक्शनचा काळाबाजार करताना पकडले आहे. आतादेखील पुणे पोलिसांनी दोन कारवायांमध्ये ५ जणांना अटक केली आहे.

रोज १५०० रेमडेसिविरची गरज, मिळतात ३००
कोरोनापासून बचावाचे रामबाण औषध म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रेमडेसिविरचा तुटवडा अमरावतीतही जाणवत आहे. परिणामी मागणी आणि पुरवठ्याचे सूत्र विस्कळीत झाले आहे. अमरावती जिल्ह्यात सद्यस्थितीत दीड हजारांची मागणी असताना पुरवठा अवघा ३०० वर आला आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत येथेही भांडाभांडी व लांबचलांब रांगा दिसून येण्याची शक्यता आहे.

जिल्हाभरात दररोज सरासरी ५०० नव्या रुग्णांची भर पडत आहे. त्यापैकी निम्म्या रुग्णांना जरी या औषधीची गरज असली तरी प्रत्येकी सहा या हिशेबाने प्रत्यक्षात दीड हजार व्हायलची उपलब्धता होणे आवश्यक आहे. परंतु निर्मात्या पाचही कंपन्यांकडून तेवढा पुरवठा होत नाही. त्यामुळे मोठ्या प्रमाणात चणचण जाणवत असून, गेल्या दोन दिवसांपासून जिल्हाधिकारी यांच्या नियंत्रणात वाटप सुरू आहे. सध्या जुना साठा असल्यामुळे अगदीच गंभीर स्थिती निर्माण झाली नाही.

राज्य शासन व अलीकडेच भेट देऊन परतलेल्या केंद्रीय पथकाने रेमडेसिविरचे नियंत्रण जिल्हाधिकारी यांच्याकडे सुपूर्द केले आहे. त्यासाठी महसूल, अन्न व औषध प्रशासन व पोलिस प्रशासनातील प्रतिनिधींचा समावेश असलेली समिती गठित केली आहे. गरजेेनुसार या समितीत वैद्यकीय तज्ज्ञांचाही समावेश केला जाऊ शकतो. दरम्यान जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांच्या निर्देशानुसार रेमडेसिविरचे वाटप केंद्रीभूत केले असून, पीडीएमसी रुग्णालयात नियंत्रण कक्ष उघडण्यात आला आहे. डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शननुसार या केंद्रांतून इतर रुग्णालयांसाठी रेमडेसिविरचे वाटप केले जात आहे.

बातम्या आणखी आहेत...