आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मराठी मातीतला बाप्पा विश्वव्यापी:बाप्पांवर 80 परदेशी अभ्यासकांचे संशोधन; अनेक अभ्यासकांनी केला पुण्यात मुक्काम

पुणे / जयश्री बोकीलएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
जपानी अभ्यासक प्रा. शोवून हिनो यांनी पुण्यातील मानाचे कसबा गणपती मंदिर तसेच मूर्तीचा सचित्र इतिहास मांडला आहे. - Divya Marathi
जपानी अभ्यासक प्रा. शोवून हिनो यांनी पुण्यातील मानाचे कसबा गणपती मंदिर तसेच मूर्तीचा सचित्र इतिहास मांडला आहे.

गणपतीच्या रूपाची, कथेची आणि उत्सवाची मोहिनी विदेशी अभ्यासकांनाही पडली आहे. सुमारे ८० पेक्षा जास्त विदेशी अभ्यासकांनी भारतीय सण आणि संस्कृती यांचा अभ्यास करताना गणपती व गणेशोत्सवाची निवड केली आहे. कॅनडाच्या विदुषी प्रा. निओना अँडरसन, अमेरिकेचे डॉ. गुद्रुन ब्युनेमान, जपानच्या चिहिरो कोईसा या संशोधकांनी मराठी मातीतला बाप्पा विश्वव्यापी केला आहे.

कॅनडाच्या प्रा. निओना गणेशोत्सवावर संशोधन करण्यासाठी ६ महिने पुण्यात राहिल्या. मी १९८६ मध्ये ‘संस्कृत साहित्यातील वसंतोत्सव’ या विषयावर संशोधन करण्यासाठी पुण्यात आले होते. तेव्हाच येथील गणेशोत्सवाची माहिती समजली आणि त्यावरही काम करण्याचे मी ठरवले. त्यासाठी मला कॅनडा सरकारच्या सोशल सायन्सेस अँड ह्युमॅनिटी रिसर्च कौन्सिलची विशेष शिष्यवृत्ती मिळाली. पती जॉन व सहकारी जॉन बिल यांच्या सहकार्याने मी हा अभ्यास केला. गणेश देवतेचा इतिहास मी मूळ संस्कृत ग्रंथांवरून इंग्रजीत करून घेतला. हा अभ्यास मी लिखित आणि दृकश्राव्य अशा पद्धतीने केला, असे त्यांनी सांगितले. जन्माने जर्मन पण अमेरिकेत असणाऱ्या संशोधक डॉ. गुद्रुन ब्युनेमान यांचा गणेश देवता, तंत्रशास्त्र याविषयीचा अभ्यास संशोधन क्षेत्रात महत्त्वाचा मानला जातो.

त्यांची डॉक्टरेट बौद्ध धर्मावर आहे, पण त्यांचा भारतीय विद्याशाखेचा प्रचंड अभ्यास आणि संशोधन आहे. गणेश देवतेच्या अभ्यासासाठी त्यांनी भारतात खूप प्रवास केला आहे. गणेश देवता, गाणपत्य संप्रदाय, गणेशविद्या, तंत्रशास्त्रातील गणेश, गणेशमूर्ती असा त्यांच्या संशोधनाचा व्यापक पट आहे. ‘१९८९ मध्ये पुण्यात भांडारकर ओरिएंटल रिसर्च इन्स्टिट्यूटच्या रिसर्च फेलो म्हणून कार्यरत असताना महागणपती तांत्रिक पूजा, गणेशाचे प्रकार, प्राणप्रतिष्ठा याविषयी अभ्यास केला होता. तो ग्रंथरूपातही उपलब्ध आहे. कीर्तनाचा अभ्यासही मी पुण्यात केला आहे,’ असे त्या म्हणाल्या. पॉल कोर्टराइट (अमेरिका), रॉजर कॉपर, कोबो दैशी (जपान), लेविस लँकेस्टर (ब्रिटिश), चिहिरो कोईसा (जपानी), आर. सी. हजरा (फ्रेंच) अशा विदेशी अभ्यासकांनीही गणेश देवता, गणेशोत्सव, उत्सवातील धार्मिक परंपरा, रूढी, रिवाज, प्राणप्रतिष्ठा अशा विषयांवर आपापल्या पद्धतीने अभ्यास आणि संशोधन केले आहे.

गणेशोत्सवावर प्रबंधिका

भांडारकर संस्थेचे माजी ग्रंथपाल व हस्तलिखितांचे संशोधक वा. ल. मंजूळ यांनी सांगितले की, पुण्याच्या अमेरिकन इन्स्टिट्यूटच्या एसीएम उपक्रमांतर्गत काही विदेशी विद्यार्थ्यांनी गणेशोत्सव व गणेश देवता या विषयावर प्रबंधिका स्वरूपातील लेखनही केले आहे. विदेशी अभ्यासक जो अभ्यास करतात तो लवकर पुस्तक रूपात प्रसिद्ध करतात. त्यामुळे मिळवलेली माहिती जतन होते व पुढील अभ्यासकांना संदर्भ म्हणून उपयुक्त ठरते. मात्सहो मिझुहो या जपानच्या नॅशनल म्युझियम ऑफ एथ्नॉलॉजी येथे सहायक प्राध्यापक आहेत. जपानमध्ये कार्यरत महेश गोगटेंशी विवाह केल्यावर त्या तेथे गणपती उत्सव साजरा करतात.'

बातम्या आणखी आहेत...