आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

दिव्य मराठी विशेष:संसर्ग रोखण्यात प्रभावी एमएच 12 मास्कची निर्मिती, पुण्यातील व्हेंचर सेंटरच्या संशोधकांचे यश

पुणेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • आरोग्यसेवकांना देणार मास्क, अशी आहेत एमएच 12 मास्कची वैशिष्ट्ये

कोरोना संकटाशी लढणाऱ्या आरोग्यसेवक तसेच पोलिस यंत्रणेसाठी उपयुक्त ठरणारे आणि संसर्ग रोखण्यात प्रभावी ठरणाऱ्या मास्कची निर्मिती करण्यात राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेचे इन्क्युबेशन सेंटर असणाऱ्या ‘व्हेंचर सेंटर’ने यश मिळवले आहे. एमएच १२ या मास्कचा दर्जा एन ९५ या वैशिष्ट्यपूर्ण मास्कच्या तोडीचा आहे, असा दावा व्हेंचर सेंटरने केला आहे. कोरोनाविरोधातील लढाई रुग्णालये आणि प्रत्यक्ष रस्त्यांवर लढणाऱ्या डॉक्टर्स, परिचारिका, पॅरामेडिकल स्टाफ तसेच संपूर्ण पोलिस यंत्रणेसाठी हे नवे मास्क देणगी म्हणून उपलब्ध करण्यात येणार आहेत.

जगभरात एम-९५ या मास्कला वैद्यकीय व्यावसायिकांकडून प्रचंड मागणी आहे. मात्र, मागणीच्या तुलनेने उत्पादन नसल्याने दर्जेदार मास्कचा सगळीकडे तुटवडा जाणवत आहे. त्यावर उपाय म्हणून एम-९५ च्या दर्जाच्या नव्या मास्कच्या निर्मितीचे आव्हान एनसीएलच्या ‘व्हेंचर सेंटर’ने स्वीकारले आणि दोन महिन्यांच्या अल्प काळात सर्वोच्च दर्जाचा मास्क संशोधित करण्यात यश मिळवले आहे, अशी माहिती सेंटरचे संचालक प्रेमनाथ वेणूगोपालन यांनी दिली. मास्कचे डिझाइन, आराखडा, सुरक्षा निकषांपासून ते प्रत्यक्ष चाचणीपर्यंतची सर्व प्रक्रिया दोन महिन्यात पूर्ण करण्यात आली. आता अल्ट्रा ऑटोसॉनिक इंडस्ट्रीजतर्फे या मास्कची निर्मिती केली जाणार आहे. प्राधान्याने आरोग्यसेवक, डॉक्टर्स, परिचारिका, अन्य कर्मचारी, पोलिस यंत्रणेसाठी आम्ही एक लाख मास्क उपलब्ध करून देणार आहोत, असेही प्रेमनाथ यांनी सांगितले.

पुणे मास्क अॅक्शन ग्रुपचे प्रवीण चव्हाण म्हणाले,‘व्हेंचर सेंटरने पुढाकार घेतला असला तरी या संशोधनात टाटा मूलभूत विज्ञान संशोधन संस्था, भाभा अणुसंशोधन केंद्र, संरक्षण संशोधन विकास संस्थेच्या ग्वाल्हेर येथील प्रयोगशाळेचे सहकार्य मिळाले आहे. या मास्कची गुणवत्ता अत्युच्च दर्जाची असल्याने ९५ टक्के संसर्ग रोखण्यास सक्षम आहे.

हा मास्क परिधान केल्यावर श्वसनाला अजितबात अडचण येत नाही. सरकारमान्य रुग्णालये, तपासणी केंद्रे, चाचणी केंद्रे आणि पोलिस यंत्रणा यांनी आमच्या वेबसाइटवर विनंती पाठवल्यास हे मास्क आम्ही त्यांना देणगी म्हणून उपलब्ध करून देणार आहोत. या क्रमांकावर (९८८१३४०७३४) संपर्क करण्याचे अवाहन चव्हाण यांनी या वेळी केले.

एमएच १२ मास्कची वैशिष्ट्ये

  • संसर्गापासून ९५ टक्के सुरक्षा
  • श्वासोच्छ्वासास त्रास नाही
  • तीन स्तरांचे संरक्षण
  • केंद्रीय मान्यताप्राप्त प्रयोगशाळेचे प्रमाणपत्र
  • सरकारमान्य रुग्णालये, डॉक्टर्स, पोलिसांना विनामूल्य देणार
0