आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नांदेड एसीबीची पुण्यात कारवाई:सेवानिवृत्त अपर जिल्हाधिकारी रामनारायण गगराणी यांना अटक

पुणेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

सेवानिवृत्त अपर जिल्हाधिकारी रामनारायण लक्ष्मीनारायण गगराणी (वय -65, रा. शारदानगर, नांदेड) यांना नांदेडच्या लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने शुक्रवारी पुण्यातील कोथरूड-कर्वेनगर परिसरातून अटक केली. गगराणी यांच्याविरुद्ध नांदेड जिल्ह्यातील वजीराबाद पोलिस ठाण्यात अपसंपदा बाळगल्याप्रकरणी गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यात गगराणी यांना अटक करण्यात आली आहे.

आर. एल. गगराणी यांच्यावर वजीराबाद पोलिस ठाण्यात अपसंपदा बाळगल्याप्रकरणी गुन्हा दाखल आहे. गगराणी यांनी त्यांच्या ज्ञात उत्पन्नापेक्षा 28 लाख 72 हजार 660 रुपयांची (45 टक्के) अधिक संपत्ती बाळगल्याचे चौकशीत निष्पन्न झाल्यानंतर त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.

गगराणी हे पुण्यातील कर्वेनगर परिसरात त्यांच्या जावयाकडे रहावयास आल्याची माहिती नांदेडच्या अ‍ॅन्टी करप्शनच्या पथकास मिळाली. त्यानंतर नांदेड एसीबीच्या पथकाने पुण्यातील कर्वेनगर परिसरात सापळा रचून त्यांना ताब्यात घेतले आहे. नांदेड परिक्षेत्राचे पोलिस अधीक्षक डॉ. राजकुमार शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली एसीबीचे अधिकारी पुढील तपास करीत आहेत. गगराणी यांना न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

अपसंपदा बाळगल्याप्रकरणी आर.एल. गगराणी यांच्यासह पत्नी जयश्री रामनारायण गगराणी (वय 57) मुलगा प्रथमेश रामनारायण गगराणी (वय 34 सर्व रा. शारदानगर नांदेड) यांच्यावर वजीराबाद पोलिस ठाण्यात कलम 13(1)(ई) सह 13 (2) भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम 1988 आणि कलम 109 आयपसी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. याबाबत नांदेड एसीबीचे पोलीस उपाधीक्षक राजेंद्र पाटील यांनी तक्रार दिली आहे. हा गुन्हा 1 मार्च 2010 ते 30 जून 2016 या कालावधीत घडला आहे.

दरम्यान, सेवानिवृत्त अपर जिल्हाधिकारी आर.एल. गगराणी यांना अपसंपदा बाळगल्याप्रकरणी अ‍ॅन्टी करप्शनच्या पथकाकडून अटक झाल्याने राज्यातील प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.ही कारवाई नांदेड एसीबीचे पोलीस अधीक्षक डॉ. राजकुमार शिंदे, अपर पोलिस अधीक्षक धरमसिंग चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली नांदेड एसीबीच्या पथकाने केली.पुढील तपास पोलीस उप अधीक्षक अशोक इप्पर करीत आहेत.

बातम्या आणखी आहेत...