आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराहिंजवडी परिसरात शिंदेवाडी येथे एकटे वास्तव्य करत असलेल्या निवृत्त विंग कमांडर यांचा विश्वास संपादन करुन, त्यांच्या वाहन चालकाने एटीएम कार्ड तसेच धनादेशावर सह्या घेऊन 39 लाख 87 हजार रुपये बँकेतून परस्पर काढून घेत फसवणूक केली आहे. याबाबत अमितवा अरुणकुमार पाल (रा. विमाननगर) यांनी हिंजवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
त्यानुसार, करण भाऊसाहेब पाटील (वय 26, रा. शांतीबन सोसायटी, नर्हे) याआरोपीवर हिंजवडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.सदरचा प्रकार 1 जुलै 2017 ते 28 एप्रिल 2023 दरम्यान घडला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार यांचे वडिले निवृत्त विंग कमांडर अरुणकुमार पाल हे एकटे रहात आहे. त्यांच्याकडे ऑगस्ट 2017 पासून करण पाटील हा वाहन चालक म्हणून नोकरीला होता. त्याने त्यांचा विश्वास संपादन केल्याने त्यांचे बँकेतील सर्व आर्थिक व्यवहारही तो पहात असे. तक्रारदार यांच्या वडिलांचे एटीएम कार्ड व धनादेश पुस्तक त्याच्याकडे सोपविले होते.
पाल यांनी स्वतःचे मृत्युपत्र ही बनविले होते. त्यांना सांभाळण्यासाठी सुधीर मारकी हा केअर टेकरही ठेवण्यात आला होता.घरात बाथरुममध्ये पडून पाल हे गंभीर जखमी होऊन त्यांच्या डोक्याला मार लागला होता. मात्र, वाहन चालक हा खोटी कारणे सांगून तक्रारदार यांची दिशाभूल करत राहिला.
तक्रारदार यांच्या वडिलांची तब्येत खराब झाल्याने शेवटी त्यांना चिंचवडमधील आदित्य बिर्ला हॉस्पिटलमध्ये दाखल केले. तेथे 25 एप्रिल 2023 रोजी त्यांचे निधन झाले.त्यानंतर 28 एप्रिल रोजी करण पाटील याने तक्रारदार यांना सहा लाख रुपये देऊन तुमच्या वडिलांनी तुम्हाला देण्यास सांगितले असे खोटे सांगितले.
मात्र, याबाबत कारण विचारता चालकाने कोणतेही कारण न सांगता तो परस्पर निघून गेला. त्यामुळे तक्रारदार यांनी वडिलांचे तीन बँक खात्याची चौकशी केल्यावर करण पाटील याने वेळोवेळी धनादेशाद्वारे तसेच एटीएममधून परस्पर पैसे काढल्याचे स्पष्ट झाले. त्याने गेल्या 6 वर्षात तब्बल 39 लाख 87 हजार 984 रुपयांचा अपहार केला. आरोपीने वडिलांची ह्युदाई कार, आई व वडिलांचे सोन्याचे दागिने व वडिलांनी बनविलेली फ्लॅटची कागदपत्रे, मुळ मृत्युपत्र लॉकरची चावी लंपास केल्याचे निष्पन्न झाले आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.