आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संविधान दिन विशेष:पूर्वसंध्येला पाच हजार दीप प्रज्वलित करून 'रिपाइं' डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना करणार अनोखे अभिवादन

पुणे3 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) - 'रिपाइं', सम्यक ट्रस्ट आणि संविधान सन्मान समिती यांच्या संयुक्त विद्यमाने संविधान दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती 'रिपाइं' चे प्रदेश सचिव बाळासाहेब जानराव व शहराध्यक्ष शैलेंद्र चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत गुरुवारी (24 नोव्हेंबरला) दिली.

याप्रसंगी प्रदेश उपाध्यक्ष असित गांगुर्डे, शहर सरचिटणीस महिपाल वाघमारे, संपर्क प्रमुख अशोक कांबळे, प्रदेश कार्यकारिणी सदस्य ऍड. मंदार जोशी, पश्चिम महाराष्ट्र सचिव मोहन जगताप आदी उपस्थित होते.

8 वर्षांपासून केले जाते आयोजन

बाळासाहेब जानराव म्हणाले, गेल्या आठ वर्षांपासून या तिन्ही संस्थांच्या वतीने संविधान दिनानिमित्त या कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. सालाबादप्रमाणे यंदाही भारतीय संविधानाचे जनक भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुणे स्टेशन येथील पूर्णाकृती पुतळ्याच्या परिसरात अनोख्या स्वरूपात अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. संविधान दिनाच्या पूर्वसंध्येला शुक्रवारी (दि. 25) संध्याकाळी 6.30 वाजता पुतळ्याभोवती पाच हजार दीप प्रज्वलित करून भारतीय संविधान व त्याचे निर्माणकर्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात येणार आहे.

काय म्हणाले शेलेंद्र चव्हाण?

शेलेंद्र चव्हाण म्हणाले, संविधान दिनानिमित्त बाईक रॅलीचेही आयोजन करण्यात आले असून, शनिवारी (दि.26) सकाळी 11.00 वाजता डेक्कन येथील छत्रपती संभाजी महाराज पुतळ्यापासून पुणे स्टेशन येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापर्यंत ही बाईक रॅली निघेल. संभाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून या रॅलीची सुरवात होईल. त्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करून, संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन होईल. दुपारी १२.३० वाजता 'रिपाइं'चे राष्ट्रीय सरचिटणीस, माजी समाजकल्याण राज्यमंत्री व साहित्यिक अविनाश महातेकर यांच्या व्याख्यानाचे आयोजन केले आहे. 'संविधानाने दिलेले अधिकार व आमची कर्तव्ये' या विषयावर महातेकर उपस्थितांना संबोधित करतील.

संविधान साक्षरतेसाठी सातत्याने उपक्रम

संविधान साक्षरता व जनजागृती करण्यासाठी सम्यक ट्रस्ट, संविधान सन्मान समिती व 'रिपाइं'च्या वतीने गेल्या अनेक वर्षांपासून सातत्याने उपक्रम राबवले जातात. 2015 पासून शाळा-महाविद्यालयात निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा व अन्य उपक्रम घेतले जातात. अभ्यासक्रमात संविधानाचा समावेश करण्यासाठी पाठपुरावा केला जात होता. त्याला शासनाकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला, अभ्यासक्रमातही संविधानाचे धडे असणार आहेत. संविधानाच्या उद्देशिकेचे प्रत्येक शासकीय कार्यालयात वाचन कारण्याबातही आम्ही आग्रही आहोत, असे बाळासाहेब जानराव म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...