आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘अस्तित्वा’ची प्रश्नचिन्हे:नदी ठाणबंद, वैदूगिरीतील कमाईही थांबली, माेलमजुरी बंद, राेजच्या जगण्याचा यक्षप्रश्न

पुरंदर- सासवड | जयश्री बोकील , मंगेश फल्लेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • पुरंदर - सासवड परिसरातील भटक्या विमुक्तांच्या समस्या म्हणजे ‘अस्तित्वा’ची प्रश्नचिन्हे

मे महिन्यातील गरम होत जाणारी दुपार आपल्याला त्रासदायक वाटू शकते, पण उघड्या माळरानावर चिरगुटं जोडून कसाबसा निवारा उभारणाऱ्यांना चढत्या उन्हाची फिकीर बाळगता येत नाही. हे सगळे फिरस्ते म्हणजे गोसावी, वैदू, डवरी, नंदीवाले, बहुरूपी, राजस्थानी चितोडी...पुरंदर तालुक्याच्या परिसरात या मंडळींनी मोकळ्या जागेत आपली पालं उभारली आहेत. त्यातल्या त्यात चितोडी मंडळी जरा स्थिरावलेली दिसली. त्यांची संख्याही शंभरपेक्षा अधिक आहे. मुख्य म्हणजे या मंडळींनी आर्थिक गुंतवणूक करून इथे काही गुंठे जमीन विकत घेतली असल्याने ते पाच वर्षांपासून इथे स्थिरावले आहेत. पण लाॅकडाऊनमुळे ‘भटकण्यावर’ आलेली बंधने, व्यवसाय बंद पडणे ( वैदू (झाडपाल्याच्या औषधी विकणारे), जोशी (भविष्य सांगणारे), नंदीवाले (घरोघरी नंदीबैल घेऊन शिधा गोळा करणारे), चितोडी (आयुर्वेदिक औषधे विकणारे), डवरी (गोंधळ, जागरण घालणारे), बहुरूपी (सोंग काढणारे) असे भटक्या विमुक्तांच्या हालअपेष्टा त्यांच्या पालांवर गेल्यावर लगेच लक्षात येतात.

नंदीवाले असणारे अनंतराव कोंडी म्हणाले, ‘इथं पालांमधून ४० जण राहतो. पण लाॅकडाऊनमुळे नंदी ठाणबंद आहे. त्यांच्या चाऱ्यापाण्याची व्यवस्था करावी लागते. पालावरची कच्चीबच्ची दिवसभर उंडारतात. मुली पाणी शोधून आणतात. बायका दिवसरात्र राबतात. मजुरीची कामं बंद झाल्याने रोजच्या थाळीचा प्रश्न रोज सोडवावा लागतो,’. झोपडीच्या दाराआडून सारिका म्हणाली,’शाळा चौथीतच सुटली. आता फक्त घरकाम,’.त्यावर ‘आता तिचं लगीन लावायचं’ असंही आजूबाजूचे म्हणाले.

पालावरच्या सुवर्णा जगण्याचे टक्केटोणपे खाऊन शहाण्या झालेल्या..त्यांनी पोटतिडिकीने या भटक्यांच्या व्यथा मांडल्या. ‘आसपासच्या शेतात, वावरात मजुरीची कामे मिळवायची, हेच काम बायका करतात. नंदीबैल कुठेही नेता येत नाही. पाणी मिळेल तिथून बायका आणतात. पालावर काही कोंबड्या, शेळ्या आहेत. नंदीबैलाच्या चाऱ्यापाण्याची भीक मागावी लागते. वैदू पालावरचे लखा शिंदे म्हणाले, ‘जंगलातून औषधी झाडपाला गोळा करण्यालाही आता जाता येत नाही. रोज वैदूगिरीतून जी कमाई व्हायची, ती बंद झाली आहे. अगदी सुरुवातीला थोडं धान्य मिळालं, पण त्यानंतर रोजच्या खाण्याचे काय, हा प्रश्न असतो,’.

अाराेग्य तपासणीसाठी पुरेशा मनुष्यबळाची वानवा
सासवड ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ किरण राऊत म्हणाले, सासवड गावात कोरोनाचे एकूण चार हजार २६४ रुग्ण मिळून आले असून त्यापैकी तीन हजार ८२८ रुग्ण बरे झाले आहेत, तर ७० जणांचा बळी गेला आहे. सध्या ३४६ रुग्ण सक्रिय असून त्यापैकी १५१ रुग्ण होम आयसोलेशनमध्ये उपचार घेतात. कोरोनाच्या पहिल्या लाटेत ज्येष्ठ नागरिकांना कोरोना लागण अधिक होती. मात्र, दुसऱ्या लाटेत सर्व वयोगटातील रुग्णसंख्या झपाट्याने वाढली. सासवड परिसरात भटके विमुक्त यांची पाले विविध ठिकाणी असली तरी त्यांची आरोग्य तपासणी करण्यासाठी पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध नाही. सध्या आरोग्य यंत्रणेवर ताण असून लवकरच परिस्थिती पूर्वपदावर येईल अशी अपेक्षा आहे.

पालं विखुरलेली , समस्या त्याच
खूप कमी जणांकडे आधार, पॅन, निवडणूक कार्ड
कोरोना टेस्टसाठी नागरिकत्वाचा पुरावा नाही
कमी जणांकडे रेशन कार्ड पण धान्य आले नसल्याची तक्रार
सीमा बंद असल्याने या फिरस्त्यांच्या हालचालीवर मर्यादा
पालांवर कोरोना टेस्ट आणि लसीकरण नाही

काेराेना काळात भटक्या विमुक्तांसाठी उपाययाेजना करणे गरजचे
धोरणांच्या, योजनांच्या आणि संशोधनाच्याही पातळीवर भटक्या-विमुक्त समाजाकडे प्रचंड दुर्लक्ष झाले आहे. कोरोना काळात उपाययोजना करताना ही बाब अतिशय ठळकपणे पुढे येत आहे. नागरिकत्वाच्या आणि अत्याचाराच्या मुद्द्यासोबतच आरोग्य, मानवी हक्काचे आणि इतर सेवासुविधा पुरवठ्याचे मुद्दे या निमित्ताने पुन्हा अधोरेखित झाले आहेत. शिवाय भटका-विमुक्त समाज एकजिनसी नसून त्यामध्ये अनेकविध जातसमूह आहेत हे लक्षात घेऊन कोरोना काळात त्यांच्यासाठी उपाययोजना केल्यागेल्या पाहिजेत आणि संशोधनावर भर दिला पाहिजे. -प्रीतम पोतदार, संशोधक, टाटा समाज विज्ञान संस्था, मुंबई

चितोडी करतात गुळवेलीचा वापर
मूळ राजस्थानी पण अनेक वर्षे इथेच स्थायिक झालेले देवसिंग चितोडी रानातून झाडपाल्याच्या औषधी गोळा करतातच, पण कोरोना काळात ते गुळवेलीचा वापर करून बनवलेले औषध देतात. आमच्या वस्तीवर शंभरपेक्षा जास्त मंडळी आहेत. पण प्रत्येक जण हे गुळवेलीचे औषध घेऊन ठणठणीत आहे. गुळवेल, लिंबपाला, कारले, मकरध्वज, जिरा भस्म आणि कस्तुरी एकत्र करून हे औषध तयार करतो, असे त्यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...