आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबेलवलकर सांस्कृतिक मंच यांच्या वतीने आणि राजेश दामले यांच्या संकल्पनेतून ७ व ८ एप्रिल, २०२३ रोजी कलारंग महोत्सवाचे आयोजन करण्यात येणार आहे. एरंडवणे येथील केशवबाग या ठिकाणी महोत्सव संपन्न होणार आहे. दोन्ही दिवशी सायं ६.३० वाजता महोत्सव सुरु होणार असून रसिकांना विनामूल्य प्रवेश आहे.
महोत्सवात यंदा सुप्रसिद्ध अभिनेते सचिन खेडेकर यांचा निळू फुले सन्मानाने गौरव करण्यात येणार आहे, अशी माहिती बेलवलकर सांस्कृतिक मंचाचे समीर बेलवलकर यांनी दिली. निळू फुले यांचे जावई ओंकार थत्ते, राजेश दामले आणि नकुल बेलवलकर यावेळी उपस्थित होते.
बेलवलकर म्हणाले, या वर्षीपासून आम्ही कलारंग महोत्सवाला सुरुवात करत आहोत. त्या अंतर्गत बेलवलकर सांस्कृतिक मंच आणि निळू फुले यांची कन्या गार्गी फुले-थत्ते यांच्या संयुक्त विद्यमाने एका चतुरस्त्र अभिनेत्यास अथवा अभिनेत्रीस दरवर्षी निळू फुले सन्मान प्रदान केला जाणार आहे.”
यावर्षी गेली चार दशके आपल्या अभिनयाने मराठी आणि हिंदी रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविणाऱ्या सचिन खेडेकर यांना तो प्रदान करण्यात येईल. रोख रुपये २१ हजार व मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप असेल, असेही त्यांनी नमूद केले.
महोत्सवाच्या पहिल्या दिवशी निळू फुले यांवरील विशेष दृकश्राव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. ‘मोठा नट; साधा माणूस’ असे या कार्यक्रमाचे नाव असून याद्वारे निळू फुले यांचा कलाप्रवास रसिकांसमोर उलगडला जाईल. याचे लेखन सतीश जकातदार यांनी केले आहे.
यानंतर गीतकार वैभव जोशी यांचा ‘ही अनोखी गाठ‘ हा विशेष कार्यक्रम होईल. यामध्ये वैभव जोशी हे त्यांच्यावर प्रभाव पाडणाऱ्या कवी व गीतकारांचा प्रवास उपस्थितांसमोर उलगडतील.
महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी ज्येष्ठ दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल यांच्या हस्ते सचिन खेडेकर यांचा निळू फुले सन्मान प्रदान करीत गौरव करण्यात येईल. निळू फुले यांच्या कन्या गार्गी फुले थत्ते यावेळी उपस्थित असतील. यानंतर राजेश दामले हे सचिन खेडेकर यांची जाहीर मुलाखत घेतील.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.