आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अँटिलिया प्रकरण:वाझे बनले आघाडीचे ओझे! सचिन वाझे यांना 11 दिवसांची एनआयए कोठडी

पुणे, नागपूरएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
रविवारी वाझे यांना एनआयए कोर्टात नेताना. - Divya Marathi
रविवारी वाझे यांना एनआयए कोर्टात नेताना.

अँटिलिया व मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणात अडकलेले सहायक पोलिस निरीक्षक सचिन वाझे आता महाविकास आघाडी सरकारसाठी ओझे बनले आहेत. वाझेंच्या अटकेने शिवसेना-काँग्रेसला चिंता वाटते आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अडचणींच्या प्रश्नावर मौन बाळगणे पसंत करीत आहेत.

आघाडी सरकारचे कर्तेकरविते राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार रविवारी बारामती येथे होते. पत्रकारांशी बोलताना त्यांनी राष्ट्रीय विषयांवर भाकिते व्यक्त केली, मात्र वाझे प्रकरणावर प्रतिक्रिया विचारताच तो ‘स्थानिक’ असल्याचे सांगून पवारांनी भाष्य करणे टाळले. शिवसेनेचे मुख्य प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी वाझे प्रकरण आघाडी सरकारसाठी ‘शुभसंकेत’ नसल्याचे म्हटले आहे, तर महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनीही वाझे यांचे प्रकरण काळजी करण्यासारखे आहे, असे मत व्यक्त केले.. गृहमंत्री अनिल देशमुख रविवारी नागपुरात होते. वाझे यांच्या अटकेनंतर त्यांच्या निलंबनाविषयी विचारले असता गृहमंत्र्यांनी उत्तर देणे टाळले. या संपूर्ण प्रकरणाचा तपास एनआयए आणि एटीएस करत आहेत. या तपासातून जी माहिती पुढे येईल त्या अनुषंगाने केंद्र आणि राज्य सरकार योग्य ती कारवाई करेल,असे ते म्हणाले.

देवेंद्र फडणवीसांनी दिले पुढील राजकीय नाट्याचे संकेत
पुणे | वाझे आणि हिरेनप्रकरणी सध्या एकच भाग पुढे आला आहे, पुढचा भाग जास्त महत्त्वाचा आहे. मात्र, पोलिसच जर अशा प्रकारे काम करत असतील, गंभीर गुन्ह्यात सहभागी होणार असतील, तर कायदा-सुव्यवस्था राहणार कशी, असा सवाल विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला. हे प्रकरण वाझेंपुरते मर्यादित नाही. यात कोण आहेत, कुणाचा पाठिंबा आहे, कुणाची काय भूमिका आहे, हे सारे तपासात बाहेर आले पाहिजे. माझ्या मते, ही केवळ सुरुवात आहे. मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांच्यामुळे आघाडी सरकारविषयी जनतेच्या मनात अनेक प्रश्नचिन्हे उभी राहिली आहेत,असे ते म्हणाले.

वाझेंच्या दोन सहकाऱ्यांसह चौघांची चौकशी
मुंबई | अँटिलिया बंगल्यासमोर स्फोटकांसह सापडलेल्या स्कॉर्पिओच्या मागे काही अंतरावर एक इनोव्हा गाडी उभी होती. ती राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) जप्त केली. वाझे यांचे सहकारी व गुन्हे शाखेतील दोन अधिकारी व दोन चालकांचीही एनआयएने रविवारी कसून चौकशी केली. दरम्यान, वाझे यांना दुपारी एनआयए न्यायालयात हजर करण्यात आले असता २५ मार्चपर्यंत कोठडी सुनावली आहे.

दहशतवाद्यांचे कनेक्शन नाही
जैश-उल-हिंदच्या नावाने टेलिग्रामवर आलेला संदेश बोगस होता, असे एनआयएने म्हटले आहे. हा केवळ दिशाभूल करण्यासाठी पाठवण्यात आला.जैश-उल-हिंद नावाची संघटनाच अस्तित्वात असल्याचे पुरावे मिळालेले नाहीत त्यामुळे अँटिलिया प्रकरणामागे दहशतवादी संघटनेचा हात असण्याची शक्यता नाही.

वकिलांचे दावे - प्रतिदावे
स्कॉर्पिओप्रकरणी वाझे यांच्याकडून महत्त्वाची माहिती मिळाली असून त्यात सहभाग असल्याची कबुली त्यांनी दिली आहे, असे एनआयएच्या वकिलांनी न्यायालयात सांगितले. मात्र वाझे यांचे वकील सुदीप पासबोला यांनी कोणताही ठोस पुरावा नसून वाझे यांनी कबुलीही दिली नसल्याचा दावा केला. सोमवारी या प्रकरणी सुनावणी असल्याचे ते म्हणाले.

विरोधी पक्षाचा केंद्रीय तपासाचा आग्रह हे काळजीचे : थोरात
संगमनेर | विरोधी पक्षांनी केंद्रीय तपास यंत्रणेकडून तपासासाठी आग्रह धरणे म्हणजे आम्हाला काळजीच वाटते की, यात कुठले राजकारण तर नाही ना? सचिन वाझे प्रकरणात काळजीच्या गोष्टी वाटताहेत. मात्र, तपास सुरू असल्याने त्यावर सध्या बोलणे योग्य नाही, असे मत महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केले आहे. भाऊसाहेब थोरात यांच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित विविध कार्यक्रमांनंतर ते पत्रकारांशी बोलत होते.

राज्यव्यवस्थेवर दबाव आणण्याचा प्रयत्न : राऊत
वाझे प्रामाणिक अधिकारी आहेत.त्यांना अटक करण्यात एनआयएने घाई केली. याप्रकरणी केंद्रीय तपास यंत्रणेची गरजच नव्हती. मुंबई पोलिसांना बदनाम केले जात आहे. राज्यव्यवस्थेवर हा दबाव आणण्याचा प्रयत्न असून हे असे घडणे सरकारसाठी शुभसंकेत नाही. - संजय राऊत, शिवसेना प्रवक्ते

बातम्या आणखी आहेत...