आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

साहित्यकृतीचा सन्मान:पुण्याच्या श्रुती कानिटकर यांना साहित्य अकादमी युवा पुरस्कार

पुणे3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

श्रीकृष्णाच्या सोबतीने जे नाव भारतीय समाजमनाने आपल्या भावविश्वात जपले, त्या राधेचे चरित्र सांगणाऱ्या संस्कृत भाषेतील ‘श्रीमतीचरित्रम्’ या ग्रंथाच्या लेखनासाठी युवा संशोधक, संस्कृत अभ्यासक श्रुती कानिटकर यांना या वर्षीचा साहित्य अकादमीचा युवा लेखक पुरस्कार जाहीर झाला आहे. ५० हजार रुपये आणि सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. श्रुती सध्या मुंबई येथे आयआयटी पवईमधून संशोधन करत आहेत.

‘श्रीमतीचरित्रम् ’ हे राधादेवींचे चरित्र आहे. त्यामध्ये पाच हजार ५५० श्लोक आहेत. हे चरित्र सात प्रकरणांत विभागले आहे. श्रीकृष्णाची व्यक्तिरेखा, चरित्र सगळ्यांच्या परिचयाचे आहे, मात्र राधादेवींविषयी माहिती नसते. मी काॅलेजच्या दुसऱ्या वर्षाला असताना, मला राधेविषयीची काही माहिती इतर अभ्यास करताना मिळाली. मला ती वेगळी वाटली. त्यामुळे तो मुद्दा लक्षात राहिला होता.जरा वेळ मिळताच, मी पुन्हा त्या मुद्द्याकडे वळले. नव्याने संदर्भ शोधायला सुरुवात केली. व्रज भाषेतील संदर्भही शोधले. सर्व पुराणांचा अभ्यास केला. प्रेमशास्त्र, भक्तिशास्त्र, शक्तिसाधना, नारदभक्तिसूत्र, तत्त्वज्ञानपर ग्रंथ तसेच व्रज भाषेतील जुने साहित्य अभ्यासले. तज्ज्ञांशी चर्चा केल्या. जुन्या भजनावली अभ्यासल्या. सुमारे वर्षभर हे सारे संदर्भ तपासणे, अभ्यासणे असे काम सुरू होते. त्यानंतर प्रत्यक्ष लेखनाला सुरुवात झाली. राधादेवींविषयी जनमानसात फारच त्रोटक माहिती उपलब्ध असल्याने, या साऱ्या जुन्या संदर्भांचे संकलन केल्यावर मी लेखन केले. त्यातून ‘श्रीमतीचरित्रम्’ हा ग्रंथ आकाराला आला,’ असे श्रुती कानिटकर यांनी ‘दिव्य मराठी’शी बोलताना सांगितले.

काय आहे ‘श्रीमतीचरित्रम्’मध्ये
श्रीमतीचरित्रम् ग्रंथात राधादेवींचे श्लोकरूप चरित्र { एकूण सात प्रकरणे { पाच हजार ५५० श्लोकांचा समावेश { इंग्रजी भाषेतील सारांश समाविष्ट { संस्कृत ग्रंथांसह व्रज भाषेतील जुने संदर्भही उपयुक्त { राधादेवींविषयीचे संदर्भ संकलित स्वरूपात उपलब्ध

बातम्या आणखी आहेत...