आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवारांचे प्रतिपादन:म्हणाल्या - गावांच्या विकासात सरपंचांनी कृतीशील विचाराने नेतृत्व करावे

पुणे16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

राष्ट्रविकासाच्या प्रक्रियेमध्ये गावाचा विकास सर्वांत महत्त्वाचा आहे. पंचायत ते पार्लमेंट या प्रवासात सरपंच हा लक्षणीय महत्त्वाचा घटक आहे. सरपंच हे केवळ एक पद नाही, सरंपच हा सर्वसामान्यांचा विश्‍वास आणि सन्मान आहे. गावाच्या विकासात सरपंचांनी कृतीशील विचाराने कार्यरत राहिले पाहिजे, असे प्रतिपादन केंद्रीय आरोग्य आणि कुटुंबकल्याण राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी केले.

एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीच्या एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंटच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या एमआयटी-राष्ट्रीय सरपंच संसद महाराष्ट्र राज्य पदाधिकारी अधिवेशन, नियुक्तीपत्र आणि ओळखपत्र वितरण सोहळ्याच्या उद्घाटक व प्रमुख अतिथी म्हणून त्या बोलत होत्या.

एमआयटी शिक्षणसंस्था समूहाचे कार्यकारी अध्यक्ष राहुल विश्‍वनाथ कराड, राष्ट्रीय सरपंच संसदेचे प्रमुख समन्वयक योगेश पाटील, अभिनव फार्मर्स क्लबचे संस्थापक ज्ञानेश्‍वर बोडके, सरपंच संसदचे सहसमन्वयक प्रकाश महाले आदी पदाधिकारी यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते. याप्रसंगी डॉ. भारती पवार व राहुल कराड यांच्या हस्ते राज्यातील विविध जिल्ह्यांतील संयोजक, संघटकांचा नियुक्तीपत्र आणि ओळखपत्र प्रदान करून गौरव करण्यात आला.

डॉ. पवार म्हणाल्या, गावाच्या विकासात सरपंचांची भूमिका महत्वाची आहे. सरपंचांनी गावाचे नेतृत्व करत असताना केंद्राच्या व राज्याच्या विविध योजना प्रभावीपणे समजून घेऊन गावकर्‍यांपर्यंत पोचवणे आवश्यक आहे. सरपंच हे केवळ पद नाही, तर कृतीशील नेतृत्वाची अपेक्षा त्यामागे आहे. त्यातूनच गावाची प्रगती होणार आहे.

गावे प्रगतीच्या मार्गाने वाटचाल करू लागली, की राष्ट्रविकासाची संकल्पना साकार होणार आहे. गावापासून केंद्रापर्यंत सर्व घटक एका ध्येयाने एकत्र आले, की कोणती किमया घडू शकते, याचे उदाहरण आपण कोरोना संकटात जगासमोर ठेवले आहे. तसाच समन्वयाचा, एकत्रित कृतीशीलतेचा विचार सरपंचांनी गावागावांतून पोहचवल्यास अपेक्षित राष्ट्रविकास घडून येईल.

गावाच्या विकासप्रक्रियेत महिलांचे योगदान अनन्यसाधारण असून, आरोग्य, शिक्षण या घटकांवर अधिक भर देणे आवश्यक आहे. त्यासाठी जाणीवजागृतीचे कार्य सरपंचांनी करावे. अन्य प्रशासकीय यंत्रणा त्यांना मार्गदर्शन करण्यास सज्ज आहेत. विकासाच्या वाटा, प्रगतीचे मार्ग घेऊन आपणच प्रत्येक समाजघटकापर्यंत पोहचणे महत्त्वाचे आहे, असेही डॉ. पवार म्हणाल्या.

बातम्या आणखी आहेत...